
सामना प्रतिनिधी । मुंबई
आझाद मैदानावर सत्तरावा एन.सी.सी दिवस दिमाखात साजरा झाला. दरवर्षी मुंबई विद्यापीठांतर्गत एन.सी.सी उपक्रम सर्वोत्कृष्टरित्या चालवणाऱ्या महाविद्यालयाला ‘व्हाईस चान्सलर बॅनर’ देऊन सन्मानित करण्यात येते. महाविद्यालयातील एन.सी.सी.चे विविध उपक्रम आणि त्यातील मुलांचा सहभाग या निकषांवर हा किताब दिला जातो. यामध्ये साठ्ये महाविद्यालय यावर्षी देखील अग्रगण्य ठरले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांमध्ये हा बॅनर महाविद्यालयाने तीनदा मिळवला आहे. शिक्षण आणि क्रीडा मंत्री श्री. विनोद तावडे आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख डॉ. सुनील पाटील यांच्या हस्ते हा बॅनर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला एनसीसीचे मेजर जनरल गजेंद्र प्रसाद, कर्नल वैभव काळे , कर्नल अमित भागी, लेफ्टनंट गौरांग राजवाडकर आणि सीटीओ कस्तुरी मेढेकर हे अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे दिल्लीत प्रतिनिधित्व केलेल्या कॅडेट्सनी मान्यवरांना सलामी दिली. तसेच विविध प्रकारच्या परेड, नृत्य, गाणी , हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनी रंगत वाढवली. कार्यक्रमात मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती येथील कॅडेट्सचा सहभाग होता.
“एन.सी.सी.च्या विविध उपक्रमांसाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. महाविद्यालयाला मिळालेला बॅनर हे एक सांघिक यश आहे आणि त्याचे संपूर्ण श्रेय हे कॅडेट्सना जाते. महाविद्यालयासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी सांगितले.

























































