
नितीन फणसे,[email protected]
अवकाशातील एकमेव ग्रह शनी… त्याचा माणसाने कायमच धसका घेतलेला आहे… अंतराळशास्त्रीच्या दृष्टीने शनीभवतालची कडी विरघळत आहेत… काय आहे यामागचे विज्ञान…
शनी ग्रहाची ओळख कधी पिडादायक अशी करून दिली जाते, तर कधी यश देणारा ग्रह म्हणूनही त्याच्याकडे पाहतात. ब्रह्मांडातला हा एकमेव असा ग्रह आहे ज्याच्या शिरावर डौलदार मुकुटाप्रमाणे काही कडी दिसतात. पण काही संशोधकांच्या अंदाजानुसार ही कडी विरघळू लागली असून किमान 300 कोटी वर्षांनी ती पूर्णपणे नाहीशी होणार आहेत. मात्र नासाच्या ‘कसिनी’ या उपग्रहाने कडय़ांजवळ जाऊन नुकताच अभ्यास केला तेव्हा ही कडी 100 कोटी वर्षांनीच दिसेनाशी होणार अशी भीती व्यक्त केली आहे.
आकाराच्या मानाने गुरू या ग्रहापाठोपाठ सर्वात मोठा शनी हा ग्रह सर्वप्रथम 1610 मध्ये सापडला. त्यानंतर 1656 साली ख्रिश्चियन हायगन्स यांनी या ग्रहाभोवती कडी असल्याचा शोध लावला. ही कडी शनीवरील बर्फ आणि खडकांपासून बनली आहेत. यात अंतराळातील काही कचराही आहे. हे तुकडे काही सेंटीमीटरपासून ते अनेक मीटर लांबही आहेत. हे सर्वकाही शनीभोवती ठरावीक परिघात फिरत आहेत. त्यामुळे शनीभोवती कडी असल्याचा भास होतो. पण ही कडी वितळायला लागली आहेत. ‘इकरस’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये आलेल्या अभ्यासानुसार, सूर्यापासून या सहाव्या ग्रहाच्या कडय़ांमधून पावसाच्या रूपात हे पाणी पडतेय. या पाण्याचा वेग एवढा आहे की, एखाद्या ऑलिंपिक आकाराचा स्विमिंग पूल केवळ अर्ध्या तासात भरेल. शास्त्रीय भाषेत याला ‘रिंग रेन’ म्हटलं जातंय.
या ग्रहावर ज्या भागात हा पाऊस पडतो त्या भागातील इलेक्ट्रॉन या ऋणप्रभारित कणांची घनता मोठय़ा प्रमाणावर कमी केली जाते. त्यामुळे या कडय़ांचा परिणाम अतिशय महत्त्वाचा असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. कारण अनेक दशकांपासून केलेल्या निरीक्षणांमध्ये असं दिसून आलं की, शनीच्या पृष्ठभागावर विशिष्ट अक्षांशांवर आयनांचं प्रमाण अतिशय कमी आहे. याचं स्पष्टीकरण या पावसाच्या परिणामातून मिळालं आहे. त्याचबरोबर हे संशोधन शनीच्या कडय़ांचे मूळ आणि त्यांची निर्मिती प्रक्रिया जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांना उपयुक्त ठरणार आहे. साधारण 80च्या दशकात नासाच्या ‘व्हॉयेजर’ या अवकाशयानाने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये शनीवर दोन ते तीन गडद रंगाचे पट्टे दिसले होते. ते पट्टे पाहिल्यावर शनीच्या कडय़ांमधून त्या पट्टय़ांवर पाऊस पडत असावा असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. शनीच्या ज्या भागात प्रभारित कणांची निर्मिती होते त्या भागात कडय़ांचा पाऊस दिसून येतो. एरव्ही प्रभारहीन (न्यूट्रल) असलेल्या वातावरणावर सौर किरणोत्सार किंवा प्रभारित कणांचा मारा होत असतो.
शनीच्या या कडय़ांची निर्मिती कधी झाली याचा शोध अजून लागलेला नाही. म्हटलं जातंय की, गुरू, युरेनस आणि नेपच्युन या ग्रहांभोवतीही अशी कडी त्या काळी असतील. पण कालौघात ती गायब झाली असावीत. शनीच्या कडय़ांच्या रहस्याबद्दल शास्त्रज्ञांना अजूनही कुतूहल कायमच आहे. या कडय़ांमधून पाणी कोसळण्याची क्रिया सतत आणि जोरात सुरू आहे, म्हणून या स्थितीत ही कडी गायब होतील या चिंतेत संशोधक पडले आहेत.
अजून बराच अवधी शिल्लक
शनीची कडी गायब होणार असं म्हटलं जात असलं तरी त्याची खात्री संशोधकांनी दिलेली नाही.
आपण शनीच्या या कडय़ांबद्दल काय जाणतो? नाहीच. या कडय़ांचं वयही आपल्याला ठाऊक नाही.
जर ती 450 कोटी वर्षांपूर्वी बनली असतील तर आतापर्यंत ती काही अंशीच विरघळली आहेत. ती पूर्ण वितळायला अजून बराच अवधी आहे.
ब्रह्मांडात गुरू, युरेनस आणि नेपच्युन या ग्रहांनाही कडी होती. ज्या काळात डायनासॉर अस्तित्वात होते तेव्हा या इतर ग्रहांवर ही कडी खूप मोठी आणि जास्त चमकदार असू शकतील. मग ती हळूहळू गायब झाली.
ती नाहीशी झाली म्हणून शनीची कडीही गायब होतील हा विचार करणं चुकीचं आहे. कारण खडक आणि अंतराळ कचराही त्यात आहे. तो तर कायमच राहणार ना… त्यामुळे शनी ग्रहच नष्ट होणार असल्यासारखी ओरड करणं व्यर्थ आहे.

























































