
मराठी रसिकांच्या मनावर कोरलेला चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला’. 16 एप्रिल रोजी या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने चित्रपटात ‘तात्या विंचू’ हा बोलका बाहुला अजरामर करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचे चिरंजीव सत्यजित पाध्ये यांनी सोशल मीडियावर फोटोंच्या माध्यमातून आठवणी शेअर केल्या आहेत.
‘ओम फट् स्वाहा…’ हा तात्या विंचूचा मंत्र ऐकला की, आपल्यालाही ‘झपाटलेला’ चित्रपटाचे दिवस आठवतात. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम आणि डायलॉग तात्या विंचूच्या चाहत्यांच्या लक्षात आहे. ज्येष्ठ अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे आणि रामदास पाध्ये यांनी ‘तात्या विंचू’ हे पात्र अक्षरशः जिवंत केले होते, तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाने चित्रपट सुपरहिट झाला. ‘तात्या विंचू’ 30 वर्षांचा झाला आहे. सत्यजित पाध्ये यांनी चित्रपटाचे जुने पह्टो आणि पडद्यामागील काही न पाहिलेले पह्टो शेअर करून हा खास दिवस साजरा केला आहे. त्यावर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सत्यजितने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘‘30 वर्षे… हो, ‘झपाटलेला’ या सिनेमाला आज 30 वर्षे पूर्ण होत आहेत. 16 एप्रिल 1993 या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला आयकॉनिक बनवला. ‘तात्या विंचू’ हे पात्रसुद्धा सिनेमाच्या इतिहासातले एक अविभाज्य घटक बनले. आज 2023 साल आहे आणि आमच्या ‘तात्या विंचू’ची लोकप्रियता प्रत्येक वर्षात वाढतच आहे. सोशल मीडियाच्या युगात आज त्याच्यावर अनेक ससे बनत आहेत. सगळय़ात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जी मुलं 1993 ला जन्मालासुद्धा आली नव्हती, त्यांनासुद्धा आमचा तात्या विंचू आवडतो. यानिमित्ताने आम्ही (‘झपाटलेला’ आणि ‘झपाटलेला-2’ची संपूर्ण टीम) आमच्या लाखो चाहत्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी हे घडवून आणले. आमच्या ‘तात्या विंचू’वर असेच प्रेम करत रहा.




























































