
आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर राजकारण आणि निवडणुकांमध्ये काहीही होऊ शकते. परंतु सध्या भाजपचे कठीण आहे, असा हल्लाबोल जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. अदानी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत. ते गप्प आहेत, याचा फटका बसेल. तसेच पुलवामा हल्ल्याच्या सदंर्भातही पंतप्रधानांनी बोलले पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली.
मोदी सरकारच्या चुकीमुळेच 2019 मध्ये पुलवामा येथे भयंकर दहशतवादी हल्ला झाला आणि 40 जवान शहीद झाले होते. मागणी करूनही गृह मंत्रालयाने जवानांना ‘एअर लिफ्ट’ करण्यासाठी विमाने दिली नाहीत, असा गौप्यस्फोट माजी राज्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केला होता. मलिक यांच्या स्फोटक मुलाखतीमुळे खळबळ उडाली. त्यानंतर सीबीआयने त्यांना नोटीस बजावली आहे. आज राजस्थान दौऱ्यावर असलेले सत्यपाल मलिक यांनी यासह विविध मुद्दय़ांवर भाष्य केले.
अमित शहा चुकीचे बोलताहेत
राज्यपालपदावरून दूर झाल्यानंतर आता पुलवामा हल्ल्याबाबत मलिक बोलत आहेत. पदावर असताना का बोलले नाहीत? असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच केले आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारताच मलिक म्हणाले, हे चुकीचे आहे. राज्यपाल असतानाच पुलवामा हल्ला झाला त्याच दिवशी मी बोललो होतो. सत्य परिस्थिती मी सांगितली होती.
पंतप्रधानपदासाठी राजनाथ सिंह योग्य उमेदवार
- सध्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत. जर त्यांच्या नशिबात असेल तर ते होतील, असे मलिक यांनी सांगितले.
- पुलवामा मुद्दय़ावर पंतप्रधानांनी बोलावे
- अदानी प्रकरणावर पंतप्रधान मोदी गप्प आहेत. त्याचा फटका बसेल. पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्याबाबतही बोलले पाहिजे, असे मलिक यांनी सांगितले.
- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत काय वाटते? या प्रश्नावर मलिक म्हणाले, राजकारण आणि निवडणुकांमध्ये काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही, मात्र सध्या भाजपचे कठीण आहे.






























































