तेल’कट’! सौदी अरेबियाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे जगभरात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण, इस्रायल-अमेरिकेतील तणाव कमी होण्याचे नाव घेत नसल्याने जगभरातील आर्थिक क्षेत्रात तणाव वाढत चालला आहे. नैसर्गिकरित्या इराणला मिळालेल्या स्थानाचा वापर इराण अमेरिका-इस्रायला हल्ले रोखण्यास भाग पाडण्यासाठी करत आहे. त्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता सौदी अरेबियाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडणार आहे.

इराण-इस्रायल युद्धामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त (Strait of Hormuz) निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे सौदी अरेबियाने आपल्या तेल उत्पादनात कपात करण्यास सुरुवात केली आहे. तेल साठवणूक करण्यासाठीच्या टाक्या (Storage Tanks) वेगाने भरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, दुसरीकडे तांबड्या समुद्राद्वारे (Red Sea) काही पुरवठा वळवण्याचे प्रयत्नही युद्धपातळीवर सुरू आहेत.

जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने घेतलेला हा निर्णय संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवेत आणि इराक यांच्यानंतर आला आहे. साठवणूक क्षमता पूर्णपणे संपून उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होऊ नये, यासाठी या देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून आधीच उत्पादन कमी करण्यास सुरुवात केली आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाने आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असून, पर्शियन गल्फमधील सागरी वाहतुकीसाठी होर्मुझचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. सध्या या मार्गावरून केवळ इराणचा पुरवठा सुरू आहे. या ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेले आहेत. यामुळे जागतिक महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात सरकारी मालकीच्या ‘सौदी अरामको’ (Saudi Aramco) कंपनीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

सौदी अरेबिया दररोज सुमारे १० दशलक्ष बॅरल तेलाचे उत्पादन करतो आणि त्यापैकी सुमारे ७ दशलक्ष बॅरलची निर्यात करतो. अरामकोने आपला काही पुरवठा नेहमीच्या होर्मुझ मार्गावरून वळवून तांबड्या समुद्रातील ‘यानबू’ (Yanbu) बंदराकडे नेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या मार्गावरील पाइपलाइनची क्षमता एवढी मोठी नाही की ती होर्मुझवरून होणाऱ्या संपूर्ण निर्यातीची जागा घेऊ शकेल.

‘जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी’ने (JPMorgan Chase & Co.) यापूर्वीच असा अंदाज वर्तवला होता की, युद्ध सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत सौदी अरेबियाची तेल आणि इंधन साठवणूक क्षमता संपुष्टात येईल.

भू-स्थानिक विश्लेषण कंपनी ‘कायरोस’चे (Kayrros) मुख्य विश्लेषक अँटोइन हाल्फ यांच्या मते, सौदी अरेबिया, यूएई, कुवेत आणि इराक या पर्शियन गल्फमधील देशांकडे मिळून आता फक्त १०० दशलक्ष बॅरलपेक्षा थोडी जास्त साठवणूक क्षमता शिल्लक आहे, जी त्यांच्या एकूण क्षमतेच्या सुमारे एक तृतीयांश आहे.

प्रत्यक्ष वापरासाठीची पातळी यापेक्षा कमी असेल आणि कोणत्याही परिस्थितीत साठवणुकीचा वापर ८० टक्क्यांच्या वर क्वचितच जातो, असे त्यांनी गेल्या आठवड्यात लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, मध्य पूर्वेतील परिस्थिती अशीच राहिल्यास साठवणूक क्षमता पूर्ण होऊन उत्पादन ठप्प करण्याची वेळ येईल आणि मग सगळीच परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जगभरात अभूतपूर्व असा गोंधळ उडेल. हा तणाव निवळणे आवश्यक असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करत आहे.