तेल टंचाईचे संकट; सौदी अरेबियाने निम्मे तेल उत्पादन थांबवले

500

इराणच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन मोठय़ा रिफायनरींवर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने निम्मे तेल उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. या निर्णयामुळे तेल पुरवठय़ावर परिणाम झाल्याने तेलटंचाईच्या धोक्याबरोबरच तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेली अरामको कंपनीची दोन ठिकाणे शनिवारी हल्ल्याने हादरली. हल्ल्यानंतर दोन्ही रिफायनरीची ठिकाणे आगीच्या भक्षस्थानी सापडली. सौदी अरेबियाने येमेनमधील हुथी नियंत्रित क्षेत्रात हल्ले केल्याच्या रागातून हे हल्ले करण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे.

सौदी सरकारच्या तेल उत्पादन बंद करण्याच्या निर्णयामुळे जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी दिवसाला 5.7 मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे 159 लिटर) म्हणजेच पाच टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे अरामकोने म्हटले आहे. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती केंद्राच्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादनाचे प्रमाण दिवसाला 9.85 मिलियन बॅरल होते. दरम्यान, अरामकोच्या दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्याचा परिणाम गॅस उत्पादनावरही झाल्याचे सौदीने म्हटले आहे. ‘हल्ल्यामुळे गॅस उत्पादनही थांबले आहे. याचा परिणाम म्हणून इथेन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा 50 टक्क्यांनी कमी होणार आहे’, अशी माहिती सौदीचे ऊर्जामंत्री अब्दुल अजीज बिन सलमान यांनी दिली आहे.

दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. आपत्कालीन पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या 48 तासांत पुढील माहिती दिली जाईल, अशी माहिती अरामकोचे अध्यक्ष आणि कार्यकारी मुख्याधिकारी अमिन नासेर यांनी दिली.

अमेरिकेचा इराणवर निशाणा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी अरामकोवर झालेल्या हल्ल्याला इराणला जबाबदार धरले आहे. पोम्पियो म्हणाले, इराणने जगभरातील ऊर्जेच्या गरजांवरच हल्ला केला आहे. याआधी सौदी अरेबियानेही इराणवर बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरविल्याचा आरोप केला आहे. शनिवारच्या अरामको हल्ल्यासाठीही दहा ड्रोन पुरवले गेले आहेत, असा सौदीचा आरोप आहे.

आशिया सर्वात मोठा खरेदीदार

अरामको कंपनीने गेल्या वर्षी प्रतिदिन 70 लाख बॅरल कच्चे तेल निर्यात केले होते. त्यापैकी तीनचतुर्थांश भाग आशियातील देशांना  पुरवठा केला आहे. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती वाढल्या किंवा तेलसंकट गडद झाले तर हिंदुस्थानसह आशियातील अन्य देशांवरही त्याचा परिणाम होईल. हिंदुस्थान ज्या आठ देशांकडून तेल खरेदी करतो त्यामध्ये सौदी अरेबिया दुसऱ्या स्थानावर आहे. हिंदुस्थानने 2017-18 मध्ये सौदीकडून 3.61 कोटी टन आणि 2018-19 मध्ये 4.03 कोटी टन तेल आयात केले होते

हिंदुस्थानची या देशांमधून तेल खरेदी

देश                       वर्ष 2017-18                 वर्ष 2018-19

इराक                    4.57 कोटी टन                 4.66 कोटी टन

सौदी अरब             3.61 कोटी टन                 4.03 कोटी टन

इराण                   2.25 कोटी टन                 2.39 कोटी टन

यूएई                   1.42 कोटी टन                 1.75 कोटी टन

व्हेनेझुएला             1.83 कोटी टन               1.73 कोटी टन

नायजेरिया             1.81 कोटी टन              1.68 कोटी टन

कुवैत                    1.1 कोटी टन               1.07 कोटी टन

मेक्सिको               0.99 कोटी टन              1.02 कोटी टन

आपली प्रतिक्रिया द्या