
सामना ऑनलाईन । मुंबई
डाव्या विचारसरणीच्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेल्या नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये 13 ऑगस्टला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित ‘हे मृत्युंजय’ नाटक सादर होणार आहे. दिग्पाल लांजेकर यांनी नाटकाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे.
जेएनयूतील ‘हे मृत्युंजय’च्या प्रयोगाबद्दल विद्यापीठाचे डीन प्रा. उमेश कदम म्हणाले, सावरकर हे देशभरातील सर्वांचे प्रेरणास्थान आहे. या विद्यापीठात सावरकर सोडले तर इतिहासामधील सर्व काही आहे. सावरकरांचा अंदमानातील कारावास, तिथल्या घडामोडी देशवासीयांना समजाव्यात म्हणून राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा प्रयोग जेएनयूमध्ये सादर करण्यात येत आहे. या नाटकाला विरोध होईल असे मला तरी वाटत नाही. त्यामागचे कारण म्हणजे सावरकरांनी आयुष्यभर राष्ट्रवाद मांडला. त्यामुळे त्यांनी दिलेला राष्ट्रवादाचा वारसा विद्यार्थ्यांपुढे ठेवण्यात काही अडचण येणार नाही, असे सांगत नाटकाला होणाऱ्या विरोधाची शक्यता उमेश कदम यांनी फेटाळली.




























































