जय जिनेंद्र म्हणत अजित पवारांकडून मोहोळ लक्ष्य! घायवळ परदेशात पळून कसा गेला?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात चांगलीच जुंपली असून गुन्हेगारांच्या प्रश्नावर पवार यांनी थेट मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. कोथरूडमधील घायवळ नावाचा गुन्हेगार परदेशात कसा पळून गेला याचा पण तपास होईल, असे सांगतानाच जय जिनेंद्र म्हणत पवार यांनी जैन बोर्डिंग जागेच्या गैरव्यवहारावरून नामोल्लेख टाळत मोहोळ यांच्यावर निशाणा साधला.

महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात केवळ तिघांचा कारभार चालायचा. हे त्रिकूट शहरातील समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरले. मेट्रो प्रकल्प आमच्या काळात सुरू झाला. परंतू आजही सर्वच रस्ते वाहतूककोंडीत अडकले आहेत. रस्त्यांच्या कामासाठी पाच वर्षांत एक हजार कोटींहून अधिकची तरतूद करण्यात आली. परंतु यापैकी केवळ 60 टक्केच रक्कम खर्च झाली. रस्त्यांच्या कामात रिंग करणे, ठराविक ठेकेदारांनाच काम मिळावे एवढाच एककल्ली कार्यक्रम राहिला. त्यामुळे शहरात कचरा समस्या, रखडलेले एसटीपींचे प्रकल्प, समाविष्ट 32 गावांत पाण्याची समस्या, अर्धवट चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम आदी रखडलेल्या कामांवर अजित पवार यांनी  पत्रकार परिषदेत बोट ठेवले.