आजारी आणि अत्यंत धोकादायक कुत्र्यांना मारण्याबाबत विचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court

भटके कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना फटकारले आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, 7 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशांचे योग्य पालन करण्यात आलेले नाही आणि या प्रकरणाकडे न्यायालय अवमाननेच्या दृष्टीने पाहत आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर आजारी आणि अत्यंत धोकादायक कुत्र्यांना मारण्याबाबतही विचार करण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाने म्हटले की, राज्यांनी ‘अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल’ (ABC) नियमांचे काटेकोर पालन केले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. हा विषय सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षा आणि पर्यावरणीय संतुलनाशी संबंधित असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. “आपण या परिस्थितीकडे डोळेझाक करू शकत नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच प्राणी कल्याण मंडळाच्या मानक कार्यपद्धतीविरोधातील (SOP) सर्व अर्ज फेटाळून लावण्यात आले.

सध्या न्यायालयाने या प्रकरणातील नियमित सुनावणी थांबवली असली तरी, 17 नोव्हेंबर रोजी प्रत्येक राज्याचा अनुपालन अहवाल तपासण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले आदेश कायम ठेवले असून सार्वजनिक ठिकाणांमधून भटके कुत्रे हटवण्याचे निर्देश पुन्हा अधोरेखित केले.

न्यायालयाने दिलेले महत्त्वाचे निर्देश पुढीलप्रमाणे आहेत :

* सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भटक्या प्राण्यांची नसबंदी योजनेच्या नियमांचे पालन करावे.
* प्रत्येक शहरात प्राणी नियंत्रण केंद्र स्थापन करावे.
* संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे.
* अँटी-रेबीज लस उपलब्ध करून द्यावी.
* राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) महामार्गांवरील भटक्या जनावरांना हटवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
* गोशाळांची उभारणी करून जनावरांना तेथे हलवावे.
* गंभीर आजारी आणि धोकादायक कुत्र्यांना मारण्याबाबत विचार करावा.
* न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करू द्यावे; अपरिहार्य परिस्थितीतच त्यांच्या विरोधातील प्रकरणांची सुनावणी करावी.

सुनावणीदरम्यान देशभरातील कुत्रे चावण्याच्या घटनांचाही उल्लेख करण्यात आला. राजस्थानातील गंगानगर, सीकर, उदयपूर आणि भिलवाडा येथील आकडे धक्कादायक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच तामिळनाडूसह इतर राज्यांतूनही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्याचे सांगण्यात आले.