
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या खात्यात झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केलेल्या समितीच्या चौकशीचे गाडे अजूनही पुढे सरकत नाही. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केलेल्या माजी कृषी आयुक्तांनी नकार दिल्यानंतर आता पुण्यातील यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू यांच्याकडे चौकशी समितीची सूत्रे देण्यात आलेली आहे, पण चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही. त्यामुळे चौकशी लांबवण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कृषी खात्यातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. एक रुपयात पीक विमा योजनेसह कृषी विभागातील इतर योजनांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे.
कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कृषी निविष्ठा व उत्पादक कंपन्या काढल्या असून त्यामार्फत निविष्ठा खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत. यातून मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तसेच गैरव्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची यादीही त्यांनी जाहीर केली होती. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला सुरेश धस यांनी निवेदन दिले.
चौकशी पूर्ण कधी होणार?
आमदार सुरेश धस यांनी कृषी अधिकाऱ्यांवर केलेले गंभीर आरोप पाहता या प्रकरणाची तत्काळ चौकशी होणे अपेक्षित होते मात्र या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात अडकले असल्याने ही चौकशी जितकी लांबवता येईल तितकी लांबविली जात आहे. या कथित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात सहा महिने पडून होता. तर कृषी विभागाच्या चौकशीलाही अद्याप मुहूर्त लागलेला नाही.





























































