
उदय जोशी । बीड
गरिबांना ५० हजार रूपये कर्ज द्यायचे असेल तर तारण घेणार्या बीड येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेने कोणतेही तारण आणि सभासद नसताना कडा सहकारी साखर कारखान्याला दिलेले कर्ज आणि व्याज असे ६८ लाख रूपये माफ केले आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत उत्कृष्ट असून माफ केलेल्या कर्जामुळे बँकेच्या तिजोरीवर ताण येणार नाही असे म्हटले आहे. बेकायदेशीर कर्ज वाटप करून ते माफ केल्याप्रकरणी सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार आयुक्त आणि पूर्णवादी बँकेला नोटीस बजावली आहे.
बीड शहरामध्ये असलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेचे कारनामे समोर येत आहेत. पूर्णवादी बँकेने कडा सहकारी साखर कारखान्याला १७ वर्षापूर्वी सभासद नसताना विनातारण ३० लाख रूपये कर्ज दिले होते. दिलेले कर्ज थकबाकीत गेले. ३० लाख रूपयाच्या कर्जावर ३८ लाख ५० हजाराचे व्याज झाले. या वसुलीसाठी बँकेने आष्टी तालुका निबंधक यांच्याकडे रीतसर दावा दाखल केला. मात्र बँकेचे सभासद नसताना आणि विनातारण बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी आष्टी तालुका उपनिबंधकांनी पूर्णवादी बँकेचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष डॉ.शरद वैद्य, तत्कालीन संचालक मंडळ यांनी कडा सहकारी साखर कारखान्याचे थकीत ६८ लाख रूपये बँकेच्या नफ्यातून बुडीत कर्ज खात्याची तरतूद करून माफ केले. बँकेच्या या निर्णयावर सभासद विजयकुमार झंवर यांनी सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. सहकार आयुक्तांनी बीडचे जिल्हा उपनिबंधक बी.एल.वांगे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये चौकशीचे आदेश दिले. बी.एल.वांगे यांनी चौकशी करून बँकेचे अध्यक्ष डॉ.शरद वैद्य, ज्येष्ठ संचालक डॉ.अरूण निरंतर यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळ, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डी.जी.सागळे, आष्टी शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक यांना दोषी धरून त्यांच्याविरूद्ध कलम ८८ अन्वये चौकशी करण्याची शिफारस केली.
या आदेशाविरूद्ध बँकेचे विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी रणजितसिंह सिसोदीया यांनी तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे खुलासा करत बँक सक्षम असून या कर्जमाफीमुळे बँकेला कोणताही आर्थिक फटका बसणार नाही असे लेखी दिले. या लेखी नाम्यानंतर सहकारमंत्र्यांनी पूर्णवादी बँकेला दिलेले कलम ८३ चे आदेश रद्द ठरवले. त्यामुळे पूर्णवादी बँकेच्या फायद्याचे झाले. मात्र बँकेचे सभासद रोहिदास तौर आणि अलका रामेश्वर पवार यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात आता अपील केले आहे. यात उच्च न्यायालयाने पूर्णवादी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार आयुक्त, सहकार सचिव, जिल्हा उपनिबंधक यांना नोटीस पाठवल्या आहेत. या प्रकरणाची सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. पूर्णवादी बँकेमध्ये अनेक आर्थिक घोटाळे दडवून ठेवण्यात आले आहेत. ८० ते १०० कोटी रूपयाचे कर्ज थकीत आहेत. सामान्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी पूर्णवादी बँक राजकारण्यांची आणि घोटाळेबाजांची बटीक झाली आहे.
डॉ.शरद वैद्य यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले
पूर्णवादी बँकेने कडा सहकार साखर कारखान्याचे ६८ लाख रूपयाचे कर्ज बँक सुस्थितीत असल्यामुळे माफ केले. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नोटीसा प्राप्त झाल्या आहेत. त्यावर बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ.शरद वैद्य यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.


























































