शिवसेनेच्या दणक्यानंतर; झाडे, फांद्या कापण्याच्या कंत्राटाला स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पावसाळय़ापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याच्या कंत्राटात झोल झाल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या कंत्राटाला स्थगिती दिली आहे. या संपूर्ण निविदा प्रक्रियेची पडताळणी करावी आणि तोपर्यंत ही प्रक्रिया थांबवावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

पावसाळय़ात दरवर्षी झाडांच्या फांद्या पडून कित्येकांचा मृत्यू ओढवतो. झाडे आणि फांद्या कोसळून दुर्घटना होऊ नयेत म्हणून दरवर्षी पावसाळय़ापूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी कंत्राट दिले जाते, मात्र या वर्षी या कामाच्या निविदांमध्ये काही विशिष्ट अटी घालण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेत पालिका अधिकाऱयांच्या संगनमताने झोल झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी केला होता. तसे पत्रही त्यांनी पालिका आयुक्तांना दिले होते. सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटदाराच्या फायद्यासाठी नवीन अटींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे केली आहे.

शहर व उपनगरांमधील सार्वजनिक व खासगी जागेवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याच्या कामाच्या निविदेत विशेष अट समावेश करून निविदा मागवल्याचे प्रभू यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. अनुभव असलेले बागकाम, कृषिकाम व शेतकाम, वनस्पतीशास्त्रतज्ञ पदवीधर किंवा पदविका, पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी, आरबोरिस्ट, शासन मान्यताप्राप्त झाड चढणारे बागकामतज्ञ अशा विशेष अटी निविदेत जाणीवपूर्वक अंतर्भूत केल्या आहेत. याचा फायदा सध्याच्या कंत्राटदाराला होणार असून त्यांची मत्तेदारी वाढणार असल्याचे प्रभू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची फाइल मागवून व निविदा प्रक्रिया करणाऱया अधिकाऱयांची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली आहे. ही निविदा प्रक्रियाच रद्द करून नव्याने निविदा मागवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचेही प्रभू यांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कारवाई करू, असेही आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे प्रभू यांनी सांगितले. कारवाई झाली तरच अधिकाऱयांवर चाप बसेल अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.