तलाठी, वन विभाग, पोलीस भरतीमध्ये घोटाळा; आम आदमी पक्षाची हायकोर्टात जनहित याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bombay-high-court-1

राज्यात तलाठी, वन विभाग व पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला असून या घोटाळय़ाची विशेष तपास यंत्रणेमार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करीत आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. काही संघटित टोळय़ा प्रत्येक भरतीमध्ये पेपर पह्डण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे अॅड. मनोज पिंगळे यांनी बुधवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर केली. खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत त्यावर 10 जानेवारीला सुनावणी निश्तित केली. राज्यात मागील काही महिन्यांपासून नोकरभरतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर घोटाळा सुरू आहे. याप्रकरणी केवळ एफआयआर नोंदवण्यात आला, मात्र पुढे कारवाई केलेली नाही. तलाठींच्या 4644 पदांसाठी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले. त्यातील बहुतांश उमेदवार हे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. भरती प्रक्रियेतील घोटाळय़ाचा या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे, असे याचिकेत म्हटले आहे.