
संभाजीनगरातील महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांनी परवागनी दिल्यामुळे 20 डिसेंबरपासून शहरातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुंबई, पूणे पाठोपाठ संभाजीनगर मनपा हद्दीतील शाळा 6 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने राज्य सरकाने 1 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली. मात्र, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांसंदर्भात 10 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाईल, असे पालिकेचे प्रशासक पांडेय यांनी जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आणखी पाच दिवस या परिस्थितीचे निरीक्षक करण्याचा निर्णय घेत 15 डिसेंबरला पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा कधीपासून सुरू करायच्या, याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. अखेर 20 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास पांडेय यांनी परवागनी दिली होती.
त्यांच्या आदेशानुसार 20 डिसेंबरला शाळेची पहिली घंटा वाजली. शहर परिसरात एकूण 746 शाळा असून त्यात पहिली ते सातवीच्या वर्गातील एकूण 2 लाख 997 विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी पालिकेच्या 71 शाळा असून त्यात 10 हजार 915 विद्यार्थी आहेत. कोरोना नियमांचे पालन करत पहिल्या दिवशी शाळेचे वर्ग सुरू करण्यात आले. शाळा सुरू करण्यापूर्वीच पालिकेच्या सर्व शाळांचे सॅनिटायझेशन व स्वच्छता करण्यात आली होती. मात्र, आता शहरातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत मनपा प्रशासकांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


























































