
कोरोनामुळे ऑनलाईन सुरू झालेल्या अनेक शाळा आता पुन्हा ऑफलाईन पद्धतीने भरू लागल्या आहेत. पण, अनेक विद्यार्थ्यांची ऑफलाईन शाळेत बसण्याची मानसिक तयारी झालेली नाही. याचा प्रत्यय ओडिशातील एका शाळेत घडलेल्या भयंकर प्रकारामुळे आला आहे.
ओडिशाच्या बरगढ जिल्ह्यातल्या एका शाळेत ही घटना घडली आहे. येथे अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्गमित्रांना पाण्याच्या बाटलीतून किटकनाशक पाजलं आहे. या शाळेला एक वसतीगृह आहे. या वसतीगृहात हे विद्यार्थी राहतात. कोरोना महामारीनंतर पुन्हा शाळा सुरू करण्यात आली.
मात्र, या विद्यार्थ्याला शाळेत जाण्यात अजिबात स्वारस्य नव्हतं. त्याला उलट ही शाळा भरू नये असं वाटत होतं. त्यामुळे त्याने एक भयंकर योजना आखली. त्याने 20 वर्गमित्रांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये किटकनाशक ओतलं.
काही विद्यार्थ्यांच्या बाटल्यांमध्ये किटकनाशक ओतल्यानंतर त्याने पुन्हा अजून काही वर्गमित्रांसोबत तेच करायचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तो रंगेहात पकडला गेला. त्याची चौकशी केल्यानंतर शाळेला सुट्टी नसल्याने आणि शाळेत जाण्याची इच्छा नसल्याने हे कृत्य केल्याचं त्याने कबूल केलं. त्याच्या 20 वर्गमित्रांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सुदैवाने अद्याप कुणालाही या विषाची बाधा झाल्याचं दिसून आलेलं नाही.





























































