पनवेल – फी भरली नाही म्हणून पालकांना कोंडून ठेवले, सेंट जोसेफ शाळेतील धक्कादायक प्रकार

फी भरली नाही म्हणून पनवेलच्या सेंट जोसेफ शाळेने चक्क पालकांनाच कोंडून टेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वत: मुख्याध्यापिकेनेच शाळेच्या मुख्य गेटला भलेमोठे कुलूप ठोकले. विशेष म्हणजे यावर आक्षेप घेणाऱ्या पालकांनाच दरडावत या बाईंनी काय करायचे ते करा, असे सांगत केबिनमध्ये पळ काढला. 10-15 मिनिटे नाहीतर तब्बल दोन तास हे पालक शाळेच्या आवारात लटकून होते. अखेर या प्रकाराची तक्रार केल्यानंतर धावत आलेल्या पोलिसांनी या सर्वाची सुटका केली. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून शाळेच्या या मुजोरीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे मध्यमवर्गीय पालकांना फी भरणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे नवीन पनवेलच्या सेंट जोसेफ हायस्कूलच्या मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांकडे फीसाठी तगादा लावला होता, असा आरोप पालकांनी केला असून यासंदर्भात पालक शाळेत गेले असता चक्क मुख्याध्यापिकेने शाळेच्या मुख्य गेटला लॉक लावून ठेवले व पालकांना आवारात अडकवून ठेवले. यावेळी पालकांनी तातडीने खांदेश्वर पोलीस ठाण्य़ाशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले , त्यानंतर त्यांनी सर्व पालकांची सुटका केली.

आधी पैसे आणि ,मगच घरी सोडेन
लॉकडाऊनमुळे आमची परिस्थिती बेताची आहे. शाळेने फीवर काहीतरी तोडगा काढावा, अशी विनंती यावेळी पालकांनी केली. मात्र एक न ऐकता मुख्याध्यापिकेने सर्व पालकांना केबिनमधून अशरक्ष: धक्के मारत बाहेर काढले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी धावत जात मुख्य गेटला कुलूप ठोकले. आधी फी घेऊन या, मग घरी सोडून असा दमच त्यांनी भरला. हा सर्व प्रकार पाहून पालकही काही काळ गोंधळून गेले होते. त्यांनी मुख्याध्यापिकेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही असे पालकांचे म्हणणे आहे.

पोलिसांना पाहताच तंतरली
मुख्याध्यापिका ऐकत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या पालकांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर आलेल्या पोलिसांना पाहून तंतरलेल्या मुख्याध्यापिकेने धावत बाहेर येत लॉक उघडले आणि घाबरून पळ काढला. दरम्यान, पालकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शाळेविरोधात घोषणाबाजी केली.

आपली प्रतिक्रिया द्या