
बदली थांबवण्यासाठी शिक्षिकांनी विद्यार्थिनींना शाळेतच ओलीस ठेवल्याची घटना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथे घडली आहे. पोलिसांनी या विद्यार्थिनींची सुटका केल्याची माहिती मिळत आहे.
लखीमपूर खिरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ही घटना घडली आहे. संध्याकाळी साडे सात वाजता शाळेतील विद्यार्थिनींना जेवण देण्यात आलं. त्यानंतर जवळपास 20 विद्यार्थिनी शाळेच्या गच्चीवर गेल्या. त्या दरम्यान या शाळेतील दोन शिक्षिका मनोरमा मिश्रा आणि गोल्डी कटियार यांनी गच्चीवर जाऊन आपली बदली होत असल्याचं त्यांना सांगितलं.
विद्यार्थिनींना आपल्या बदलीचं काहीही वाटत नाही असं पाहून त्या दोघींनी गच्चीच्या दरवाजाची कडी लावली आणि त्या खाली निघून आल्या. बराच वेळ उघडण्याचा प्रयत्न करूनही दरवाजा उघडला नाही, तेव्हा विद्यार्थिनींनी घाबरून आरडाओरडा करायला सुरुवात केली. काही वेळाने त्यांचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ शाळेखाली जमा झाले. त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलीस आल्यानंतर रात्री दोन वाजता या विद्यार्थिनींची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी दोन्ही शिक्षिकांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर बदली थांबवण्याच्या हेतूने विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात आणणं, वॉर्डनसोबत शिवीगाळ करणं, विद्यार्थिनींना भडकवणं असे आरोप आहेत. दरम्यान या शिक्षिकांनी मात्र आपण असं काहीही केलेलं नसून हे आपल्याविरुद्ध एक षड्यंत्र असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




























































