भिवंडीत शाळा कोसळली; शंभर विद्यार्थ्यांचा जीव बचावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | भिवंडी

वादळी वारे आणि मुसळधार पाऊस याचा जोरदार फटका भिवंडी शहराला बसला. पावसाच्या दणक्यामुळे तालुक्याच्या दुगाड या गावात असलेली ठाणे जिल्हा परिषदेची शाळाच कोसळली. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. त्यामुळे १०२ विद्यार्थ्यांचा जीव वाचला. ही घटना दिवसा शाळा सुरू असताना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांवर मोठे संकट ओढवले असून यानिमित्ताने मोडकळीस आलेल्या जुन्या शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुनर्बांधणी करणार
केवळ २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या शाळेची अशी दुर्दशा झाल्याने पालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दम्यान या शाळेच्या डागडुजीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८ लाख रुपये मंजूर झाले होते.पण स्थानिक वादामुळे त्याचा उपयोग झाला नाही. आता दुगाडमधील शनिवारी रात्री कोसळलेली शाळा पुन्हा नव्याने बांधणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासगी घरांमध्ये वर्ग भरणार
ऐन पावसाळ्यात शाळेचे छत कोसळून दुर्घटना घडल्याने विद्यार्थ्यांना शेजारच्या खासगी घरांचा आसरा घ्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सोमवारपासून खासगी घरांमध्ये शाळा भरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

विरोध केल्याने दुरुस्ती रखडली
मौजे दुगाड येथील मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असून त्याची कार्यवाहीदेखील करण्याचे प्रस्तावित होते. मात्र स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने शाळेची दुरुस्ती होऊ शकली नाही.त्यामुळेच आजची दुर्दैवी दुर्घटना घडली असल्याचा दावा दुगाड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंता शेलार यांनी केला आहे. दुगाड येथील जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते चौथीपर्यंतची असून आजूबाजूच्या गावांमधील मुलेही शिकायला येथे येतात. शाळेचे बांधकाम २५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. सिमेंट व विटांचे बांधकाम असलेल्या इमारतीवर लाकडी वासे, कौले टाकण्यात आली होती. लाकडी वासे सडल्याने छत कमकुवत झाले होते. त्यामुळे ते कधीही कोसळण्याची भीती होती.