वेळापुरात सापडले छत्रपती शाहू महाराजांचे शिल्प

मराठय़ांच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा देणारा शोध सोलापुरात लागला आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील खंडोबा मंदिराच्या आवारात इतिहास अभ्यासक अमर साळुंखे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या तत्कालीन दगडी शिल्पाचा शोध लागला. ‘मराठय़ांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा व जिंजी’ या ग्रंथाचे लेखक असलेल्या साळुंखे यांनी हा शोध त्यांच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान लावला. हे शिल्प आजवर खंडोबाचे शिल्प म्हणून ओळखले जात होते, मात्र ते शाहू महाराजांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या शिल्पात छत्रपती शाहू महाराज आकर्षक अलंकारांनी सजवलेल्या  तोलदार घोडय़ावर स्वार आहेत. महाराजांच्या कानात बाळी, गळय़ात नाजूक माळ, डाव्या हातात लगाम आणि उजव्या हातात धोक्याच्या दोरीचे टोक आहे. कपाळी गंध, ओठांवर भरदार मिशा, तर घोडय़ाच्या समोर अब्दागीर हातात अब्दागिरी घेऊन उभा आहे. घोडय़ाच्या मागे हुक्कापात्र हातात घेतलेला सेवक दिसतो. यातून शाहू महाराजांच्या दरबारी जीवनाची झलक देणारी आहे. इतिहास अभ्यासक रवी मोरे, अजय जाधवराव आणि सुरेश जाधव यांनीही या शिल्पाचा शाहू महाराजांशी असलेला संबंध मान्य केला आहे.