कार्यालयाचा सुरक्षारक्षकच निघाला चोर, सापळा रचून केली अटक

पुणे शहरातील कर्वेरस्ता परिसरातील कार्यालयाचा सात वर्षांपासून सुरक्षारक्षक असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट एकने चोरीप्रकरणी अटक केली आहे. अमर गजानन सुर्यवंशी (वय 48 रा. शास्त्रीनगर, कोथरुड ) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी प्राची कडू (30) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कर्वेरस्त्यावर रिजेंट चेंबर्समध्ये एका खासगी कंपनीचे कार्यालय आहे. 13 ते 14 जानेवारीला कार्यालय बंद असताना चोरट्यांनी शटर उचकटून लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा असा 22 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी संबंधित कार्यालयाच्या व्यवस्थापिका प्राची कडू यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार डेक्कन पोलीस आणि गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना पोलीस अंमलदार शशिकांत दरेकर आणि दत्ता सोनवणे यांना चोरट्याची माहिती मिळाली. गुन्हा घडलेल्या ठिकाणी वॉचमन म्हणुन कामास असलेला अमर सुर्यवंशी याचा गुन्हयात सहभाग असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, सतिश भालेकर, अजय थोरात, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या