
‘26/11’ च्या भयानक आठवणीने आजही सुन्न व्हायला होते. त्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेत कमालीचे बदल करण्यात आले. अत्याधुनिक शस्त्र्ाs घेतली गेली, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होऊ लागला. पण दरम्यानच्या काळात रेल्वे स्थानके, सार्वजनिक ठिकाणे, बस डेपो येथे मेटल डिटेक्टर, हॅण्ड मेटल डिटेक्टर आदी तैनात केलेल्या सुरक्षा यंत्रणा केवळ शोभेच्या वस्तू बनल्या होत्या. नंतर नंतर तर त्याकडे कोणी लक्षदेखील देत नव्हते. पण ‘26/11’ जवळ आला की सर्व सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या होतात आणि सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते.
‘26/11’ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकावरील मेटल डिटेक्टर पुन्हा इन अॅक्शन झाले आहेत. आरपीएफ तसेच जीआरपीएफकडून लाँग मार्च काढला जात आहे. प्रवाशांच्या संशयास्पद सामानांची तसेच संशयित प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी लावली जात असून हॉटेल, लॉजिंगची तपासणी केली जात आहे. गर्दीच्या ठिकाणांवर बारीक वॉच ठेवला जात आहे. समुद्रकिनारे, रहदारीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस पथके गस्त घालत आहेत. मुंबई पोलिसांव्यतिरिक्त सर्वच सुरक्षा यंत्रणांनी ‘26/11’ च्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षा यंत्रणा एकाच वेळी इन अॅक्शन झाल्याने नागरिकांमध्येदेखील कसाब व त्याच्या सहकारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.


























































