सिरम इन्स्टिटय़ूटच्या अदर पुनावाला यांनी विनंती केल्यास सुरक्षा पुरवू; राज्य सरकारची हायकोर्टात हमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविशिल्ड लस तयार करणाऱया पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी राज्य सरकारकडे मागणी केल्यास त्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवू अशी हमी राज्य शासनाच्या वतीने आज हायकोर्टाला देण्यात आली.

अदर पुनावाला यांना लसीसाठी अनेक बडय़ा व्यक्तींचे धमक्यांचे फोन आले असून त्यांनी याबाबत यूकेतील एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. अदर पुनावाला हे सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत ब्रिटनमध्ये राहत आहेत. त्यामुळे पुनावाला यांना धमकवणाऱया लोकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅड. दत्ता माने यांनी याचिकेद्वारे केली आहे. तसेच पुनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची तरतूद करावी असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. पुनावाला यांना यापूर्वीच केंद्राने सीआरपीएफ ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. त्यात राज्य सरकारने बाजू मांडताना सांगितले की, पुनावाला यांनी विनंती केल्यास शासन त्यांना पर्याप्त सुरक्षा पुरवेल. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सदर याचिका निकाली काढली.