
विनोद पवार । पिंपरी
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हिंदुस्थानी जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. असे असताना शिवाजी चौकात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्या रेल्वेच्या एका टीसीवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत रेल्वे प्रशासनाने देखील त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.
उपेंद्रकुमार श्रीवीर बहादुरसिंग (वय 39, रा. पटणा, राज्य -बिहार, सध्या राहणार रेल्वे क्वार्टर, लोणावळा) असे या टीसीचे नाव असून तो लोणावळा स्थानकावरच कामाला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सर्व पक्षियांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जात उपेंद्रकुमारवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी कारवाई केली असल्याचे सांगत पोलीस निरीक्षक पाटील यांनी जमावाला शांत केले.

























































