
दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याने 112 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत हिंदुस्थानी क्रिकेट संघाला विजय मांजरेकर, रमाकांत देसाई यांच्यासह दिग्गज 22 कसोटीपटू, एक आंतरराष्ट्रीय पंच आणि शेकडो रणजीपटू दिले आहेत. क्रिकेटपटूंची ही खाण अव्याहत राखण्यासाठी उच्च दर्जाच्या खेळाची निर्मिती करण्यासाठी शिवाजी पार्क जिमखाना कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही 12 व 14 वर्षांखालील वयोगटातील मुलांची निवड चाचणी 16 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता तर 16 व 19 वर्षांखालील वयोगटातील मुलांची निवड चाचणी 17 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता एसपीजी क्रिकेट ग्राऊंड, शिवाजी पार्क, दादर पश्चिम येथे विनाशुल्क घेण्यात येणार आहे. हिंदुस्थानी ज्युनियर क्रिकेट संघात शिवाजी पार्क परिसरातील मुलांना संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा मोफत उपक्रम राबविण्यात येणार आहे.
एसपीजी निवड चाचणीचा उपक्रम उपरोक्त चार वयोगटांतील मुलांसाठी विनाशुल्क खुला असून चाचणी पूर्णपणे क्रिकेट गुणवत्तेच्या आधारे तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना येत्या क्रिकेट हंगामात एसपीजीमार्फत विनाशुल्क क्रिकेट सराव व स्पर्धात्मक सामने खेळण्यास मिळणार आहेत. तरी इच्छुक संबंधित खेळाडूंनी निवड चाचणीसाठी जन्म व राहण्याचे पुरावे-प्रमाणपत्र आणि क्रिकेट कीटसह संबंधित वयोगटातील तारखेनुसार सकाळी 9 वाजता एसपीजी क्रिकेट ग्राऊंड, शिवाजी पार्क, दादर पश्चिम येथे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी शिवाजी पार्क जिमखाना कार्यालय येथे 15 डिसेंबरपर्यंत दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन शिवाजी पार्क जिमखान्याचे जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर यांनी केले आहे.

























































