उत्तर प्रदेशमध्ये एक स्वयंघोषित बाबा सहाव्यांदा लग्न करायला निघाला होता. त्याच्या पहिल्या बायकोमुळे बिंग फुटले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याचे एक एक कारनामे एकून पोलिसही हैराण झाले आहेत.
अनुज कथेरिया असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अनुजने 2005 साली मनीपुरी जिल्ह्यात राहणार्या एका तरुणीशी लग्न केले. दोघांचे न पटल्याने त्याच्या बायकोने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. नंतर 2010 साली अनुजने बरेलीतील एका तरुणीशी लग्न केले. तिनेही नंतर घटस्फोटासाठी अर्ज केला. चार वर्षानंतर त्याने औरारिया जिल्ह्यातील एका महिलेशी लग्न केले. नंतर अनुजने आपल्या तिसर्या बायकोच्या चुलत बहीणीशी लग्न केले. अनुजच्या चौथ्या बायकोला त्याच्या तीन लग्नाबद्दल जेव्हा कळाले तेव्हा तिने आत्महत्या केली.
2019 मध्ये अनुजने पाचव्यांदा लग्न केले. लग्नाच्या काही दिवसानंतरच त्याने आपल्या बायकोला छळण्यास सुरूवात केली. या प्रकरणी अनुजच्या पाचव्या बायकोने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अनुजला अटक केली होती. यापूर्वी 2016 साली आपल्याच भावाच्या बायकोवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
अनुज मॅट्रिमोनियल साईट्सवर लकी पांडे नावाने मुलींना संपर्क करायचा. तो स्वतःला शिक्षक, उद्योगपती किंवा तांत्रिक असल्याचा सांगायचा. कधी कधी बी एससी पदवीधर असल्याचेही मुलींना सांगून आपल्या जाळ्यात ओढायचा.
महिलांचा विश्वास मिळवल्यानंतर अनुज या त्यांना आश्रमात न्यायचा. त्यांच्यावर तंत्र मंत्र करायचा. इतकेच नाही. तर त्यांच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्याचा बहाण्याने त्यांना जाळ्यात ओढायचा.
नंतर अनुज सहाव्यांदा लग्न करायला निघाला होता. तेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच मॅट्रिमोनियल साईटवरून तो 32 महिलांच्या संपर्कात होता असेही तपासात कळाले आहे.




























































