रेल्वे स्टेशनवरील लिंबूपाणी, कालाखट्टा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

लोकलच्या गर्दीतून घामेजलेल्या अंगाने प्लॅटफॉर्मवर उतरलो की आपसूकच पावले वळतात ती लिंबूपाणी नाहीतर कालाखट्टाचा घोट घेण्यासाठी. अवघ्या दहा रुपयांत हे पेय पोटात रिचवले की मग तरातरा ऑफिसच्या दिशेने चालायला मुंबईकर मोकळे. मात्र कुर्ला येथील लिंबूपाण्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सतर्क झालेल्या मध्य रेल्वेने आता सर्व स्थानकांवरील लिंबूपाणी, कालाखट्टाचे स्टॉल्स बंद करण्याचा किंवा स्टॉल्सवरील विक्रीलाच टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

कुर्ला स्थानकातील व्हिडीओनंतर रेल्वेने तातडीने बैठक बोलावली आणि सर्व स्थानकांवरील स्टॉल्सची झाडाझडती घेण्याचा निर्णय झाला. या स्टॉल्सवरील रोझ मिल्क, कालाखट्टा यांच्यासह सर्व पेयांवर बंदी घालण्याचे आदेश पारीत झाले. प्रवाशांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊनच 27 मार्च रोजी हा निर्णय घेतल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी  सुनील उदासी यांनी सांगितले. जे सरबत बनवले जाते त्यावर बंदी आहे, मात्र बाटलीबंद शीतपेयांवर बंदी नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये 49 स्थानके आणि दोन गुडस् शेड मिळून अशा 51 ठिकाणी 244 कॅटरिंगची युनिटस् असून त्यात 118 चहाचे स्टॉल तर 82 छोटे टपरीवजा स्टॉल आहेत. या स्टॉलचे कर्मचारी स्थानकातच राहतात. कँटीनच्या छतावरच झोपतात व रेल्वेचे पाणी वापरतात. स्थानकाचे स्टेशन मास्तरच त्यांची ‘सोय’ करतात. त्यांची कोणतीही नोंद होत नसून त्यातील बरेच जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात असे सूत्रांनी स्पष्ट केले. सीएसएमटी, ठाणे, दादर, कुर्ला अशा ठिकाणी या कँटीनमधूनच गैरप्रकारे स्थानकांच्या बाहेरही चहाची विक्री केली जात असल्याचे सांगण्यात येते.

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये 49 स्थानके आणि दोन गुडस् शेड अशा 51 ठिकाणी 244 कॅटरिंगची युनिटस् असून त्यात 118 चहाचे स्टॉल तर 82 छोटे टपरीवजा स्टॉल आहेत.

याच्यामुळे सगळय़ांना ‘पिळले’!

हार्बर मार्गावरील छताचे पत्रे बदलण्याचे काम सुरू असल्यामुळे रेल्वेच्या क्र. 7 व 8 दरम्याच्या फलाटावरील कँटीनच्या छतावर सरबत तयार करणाऱ्या कामगाराचा एक व्हिडीओ समोर आला होता. याच्यामुळेच आता मध्य रेल्वेने सर्वच स्टॉलमालकांना ‘पिळले’ आहे!