
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून एकापाठोपाठ एक निर्णय घेत आहेत. हिंदुस्थानसह अन्य देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृतपणे राहणाऱ्या नागरिकांना थेट विमानाने त्यांच्या देशात पाठवले जात आहे. आता हिंदुस्थानातील जे लोक अमेरिकेत राहतात. त्यांना जर हिंदुस्थानात पैसे पाठवायचे असेल तर तेसुद्धा महाग होणार आहे.
अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन बाह्य रेमिटन्सवर म्हणजेच अमेरिकेबाहेर इतर देशांमध्ये पैसे पाठविण्यावर 5 टक्के टॅक्स लावणार आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. हा निर्णय लागू झाल्यास दरवर्षी अमेरिकेतून हिंदुस्थानात येणाऱ्या पैशांवर तब्बल 1.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 13.3 हजार कोटी रुपये शुल्क भरावे लागू शकते. हा निर्णय लागू करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच एक विधेयक आणणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास याचा फटका जवळपास 4 कोटी नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्रीन कार्डधारक आणि एचवनबी व्हिसावर अमेरिकेत राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांचादेखील समावेश आहे.
परदेशातून येणारा पैसा झाला दुप्पट
गेल्या 10 वर्षांत परदेशातून हिंदुस्थानात येणारा पैसा दुप्पट झाला आहे. मार्च 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आरबीआयच्या अहवालानुसार, 2010-11 मध्ये, अनिवासी हिंदुस्थानींनी देशात 55.6 अब्ज डॉलर्स पाठवले. 2023-24 मध्ये हा आकडा 118.7 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी सर्वाधिक पैसे हिंदुस्थानात पाठवले आहेत. हिंदुस्थानी नागरिकांनी अमेरिकेतून जवळपास 32.9 अब्ज डॉलर्स पाठवले आहेत.
हिंदुस्थान ठरला अव्वल देश
जगात सर्वाधिक रेमिटन्स मिळवणाऱ्या देशांच्या यादीत हिंदुस्थानचा अव्वल क्रमांक लागतो. 2001 मध्ये जागतिक रेमिटन्समध्ये भारताचा वाटा 11 टक्के होता, जो 2024 पर्यंत 14 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 2024 मध्ये 129 अब्ज डॉलर्ससह रेमिटन्स मिळवणाऱ्या टॉप 5 देशांमध्ये हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मेक्सिको (68 अब्ज डॉलर्स), चीन (48 अब्ज डॉलर्स), फिलीपिन्स (40 अब्ज डॉलर्स) आणि पाकिस्तान (33 अब्ज डॉलर्स) यांचा क्रमांक लागतो. हे आकडे जागतिक बँकेने डिसेंबर 2024 मध्ये जाहीर केलेले आहेत.


























































