
जन्मदात्या आईचा सांभाळ करत नाही, मारहाण व शिवीगाळ करत असल्याबाबत आलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी वडगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी संबंधित महिलेच्या तक्रारीनुसार या महिलेचा मुलगा गणपती बापू पाटील (रा.भादोले, ता.हातकणंगले) व दोन नातू यांच्यावर ज्येष्ठ नागरिक व पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झालेला पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
भादोले येथील सावित्री बापू पाटील (वय 70) यांना त्यांचा मुलगा गणपती बापू पाटील हा कोणतीही मदत करत नाही. तसेच पालन पोषण व सांभाळ करीत नाही. मागील चार वर्षापासून मारहाण करत असून शिवीगाळ व दमदाटी करत आहे. तर नातू अभिजीत गणपती पाटील व दिपक गणपती पाटील हे मागील दोन वर्षापासून लाथा बुक्क्यांनी मारहाण करतात. मुलगा गणपती याने मंगळवारी महिलेस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून अखेर या महिलेने वडगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्येष्ठ नागरिक दिनी यांचेवर ज्येष्ठ नागरिक व पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम कलमाखाली जिल्ह्यात पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पो.ना.पावरा करत आहेत.


























































