पेणमध्ये एसटी बसखाली येऊन ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

पेण बस स्थानकात एका ज्येष्ठ नागरिकाचा एसटी बसच्या मागच्या चाकाखाली येऊन झालेल्या अपघात जागीच मृत्यू झाला आहे. सुरेश गंगाराम रिसबुड (७५) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पेण बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

पेण आगारात मुंबई-श्रीवर्धन ही एसटी बस स्थानकात प्रवेश करत असताना रिसबुड हे आपल्या सायकवरून बस आगारात प्रवेश करीत होते. त्यावेळी तोल जाऊन ते बसच्या मागच्या चाकाखाली आले. यात यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पेण आगारातील अनधिकृत पार्किंग आणि अरुंद प्रवेशद्वारामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत असल्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.