
परदेशात जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या बॅगेत काय आहे, असे विचारल्यामुळे नाराज झालेल्या ज्येष्ठाने चक्क बॅगेत बॉम्ब आहे, असे म्हटले. कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी मध्यरात्री मोठी खळबळ उडाली. दरम्यान, या ज्येष्ठाला अटक करण्यात आली.
कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशात जाण्यासाठी शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमाराला एक ज्येष्ठ जोडपे आले. काऊंटरवर असलेल्या कर्मचाऱ्याने बॅगेत काय आहे, असे विचारल्यावर बॅगेत बॉम्ब आहे, अशी मस्करी ज्येष्ठाने केली. कर्मचाऱ्याने तातडीने विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकाला याची माहिती दिली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन नेदुमसेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली, मात्र, नंतर त्यांना टेबल जामीन देण्यात आला.



























































