
देशात मंकीपॉक्स संसर्गाचा धोका वाढण्याची भीती आहे. याचदरम्यान पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटने खूशखबर दिली आहे. मंकीपॉक्सच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी लवकरच अमेरिकन कंपनी नोव्होव्हॅक्सच्या बरोबरीने मंकीपॉक्स प्रतिबंधक लस विकसित केली जाईल, अशी घोषणा सिरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी मंगळवारी केली.
देशातील मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाचा धोका रोखण्यासाठी मंकीपॉक्स प्रतिबंधक आरएनए लस तयार करण्याच्या दिशेने सिरम इन्स्टिटय़ूटने पाऊल टाकले आहे. याबाबत नोव्होव्हॅक्स कंपनीशी बोलणी सुरू आहे. पुढील तीन महिन्यांत डेन्मार्कच्या बेव्हेरिअन नॉर्डिक कंपनीकडून स्मॉलपॉक्स लस उपलब्ध होऊ शकते. आणीबाणीच्या परिस्थितीत मोठय़ा प्रमाणावर स्मॉलपॉक्स लसीची आयात करण्याबाबतही विचार केला जात आहे. या लसींची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी सिरम इन्स्टिटय़ूट सक्षम आहे, असे पुनावाला यांनी सांगितले.






























































