संतोष देशमुख हत्याकांडाचा वाल्मीक कराड हाच सूत्रधार! न्यायालयाचे निरीक्षण

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचे निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदवले. वाल्मीक कराडने केलेला दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीच्या प्रकरणातून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह त्याच्या गँगला मकोका लावण्यात आला आहे. विशेष मकोका न्यायालयासमोर या हत्याकांडाची सुनावणी चालू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज वाल्मीक कराडने विशेष मकोका न्यायालयासमोर केला होता. हा अर्ज फेटाळताना विशेष न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत.

– खंडणीला अडसर आणला म्हणूनच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या. वाल्मीक कराड हाच हत्येचा मुख्य सूत्रधार.
– वाल्मीक कराडवर वीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात गंभीर स्वरूपाच्या दहा गुन्हय़ांचा समावेश आहे.
– साक्षीदार, डिजिटल पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे तसेच फॉरेन्सिक पुरावे वाल्मीक कराड हाच सूत्रधार असल्याचे स्पष्ट करतात.
– वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या. आवादा पंपनीला दोन कोटी रुपये खंडणीसाठी धमकावले.

अखेर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिला; ज्ञानेश्वरी मुंडे मुंबईकडे रवाना

परळी येथील महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. दोन वर्षे होऊनही हत्येचा तपास होऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांना अनेकदा भेटण्याचा प्रयत्नही महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता. अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडून भेटीसाठी उद्या गुरुवारची वेळ देण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या सर्व कुटुंबासह मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.