स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे रविवारी सुवर्ण महोत्सवी अधिवेशन, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी अस्मिता, अभिमान आणि अस्तित्वासाठी लढणाऱया शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन रविवार, 11 फेब्रुवारीला एल्फिन्स्टन येथील हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवनात सकाळी 9 वाजता होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर शिवसेने नेते-खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करणार आहेत.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनासाठी शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, मुंबईतील पुरुष व महिला विभागप्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या विविध 300 समित्यांचे सुमारे 10 हजार सभासद, पदाधिकारी अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. अधिवेशन यशस्वी होण्यासाठी नियोजनासाठी विविध आस्थापनांतील स्थानीय लोकाधिकार समित्यांवर जबाबदारी सोपवली आहे.

अधिवेशनात गेल्या 50 वर्षांतील महासंघाच्या यशस्वी चळवळीचा आढावा घेण्यात येणार असून पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई हे लोकाधिकार चळवळीचा गेल्या 50 वर्षांतील यशस्वी वाटचालीचा आढावा घेणार असून महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर आभार प्रदर्शन करणार आहेत. लोकाधिकार महासंघाचे हे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी असंख्य पदाधिकारी, शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत, शाखाप्रमुख आदी अहोरात्र झटत आहेत.