
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
छत्तीसगडमध्ये डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डच्या पोलिसांनी चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. राजनंद गावातील बगनादी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डी.एम. अवस्थी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सीतागोटा जंगलाच्या परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून सुरक्षा दलाचे सर्व जवान सुरक्षित असल्याचे अवस्थी यांनी सांगितले. चकमकीनंतर घटनास्थळाहून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे.
नक्षलवाद रोखण्यासाठी नक्षलप्रभावीत भागातील जनतेत जागरुकता निर्माण करण्याचे काम सुरक्षा दलाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांवर जनतेचा विश्वास वाढवण्याचेही प्रयत्न होत आहेत. नक्षलवादाविरोधातील मोहिमेला गती देण्याबरोबच जनतेतील नक्षलवाद्यांची भीती आणि दहशत दूर करण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्तीसगडच्या अनेक भागात नक्षलवादाचा प्रभाव असून काही भाग नक्षलवाद्यांचे गड म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या भागात नक्षलवादविरोधी माहिमेला गती देण्यात आली आहे. दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. अशी स्मारके उभारून जनतेत दहशत निर्माण करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असतो. या नक्षलविरोधी कारवाईत सात नक्षलावद्यांचा खात्मा करण्यात आल्याने सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.


























































