प्राध्यापकास लुटणारी टोळी जेरंबद; पोलिसांची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

तरूणीच्या मैत्रीच्या जाळ्यात फसलेल्या कोपरगावच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकास एका टोळीने मंगळवारी रात्री लुटले होते. याप्रकरणाचा कसून तपास करून अवघ्या 24 तासात दोन महिलांसह सात जणांच्या टोळीला शहर पोलिसांनी गजाआड केले. सागर रावसाहेब राक्षे, ओंकार कान्हू गिते, किशोर शामराव भोसले, गणेश शंकरराव रोकडे, राजन अशोक ब्राम्हणे, प्रियंका मारूती कांगणे, संगीता प्रल्हाद पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिपक सिताराम मुसमाडे (वय 33) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सात जणांविरूद्ध शहर पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रियंका कांगणे हिने रोशनी गायकवाड असे खोटे नाव सांगून दिपक मुसमाडे यांच्याशी संपर्क साधला. दूरध्वनीवरून मैत्री केली. सात आठ दिवसानंतर मुसमाडे यांना श्रीरामपूरला भेटण्यासाठी बोलावले. ठरल्याप्रमाणे मुसमाडे इंडिका गाडी घेऊन आले. त्यात तरूणीला बसवून नेवासा रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ ते गेले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी गाडी अडवून माझ्या बहिनीला कोठे घेऊन जाता, असा जाब त्यांना विचारला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या मुसमाडे यांना आरोपींनी मारहाण केली. त्यांचा मोबाईल, खिशातील रोख रक्कम, व इंडिका कार लुटून पोबारा केला.

मुसमाडे यांनी शहर पोलिसात याप्रकरणी फिर्याद नोंदविली. अतिरिक्त पोलिस अधिक्षक रोहिदास पवार, पोलीस उपअधिक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून वेगाने तपास करण्यात आला. 24 तासांच्या आत सात आरोपींना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. दरम्यान टोळीतील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींनी अशाप्रकारे आतापर्यंत शिर्डी, राहाता परिसरात अनेक गुन्हे केले असल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.