वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला भरधाव ट्रकनं उडवलं, एकाच कुटुंबातील 7 ठार

हरियाणातील अंबाला येथे गुरुवारी मध्यरात्री भरधाव ट्रक आणि वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला असून 20हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंबाला-दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसमधील सर्व लोक वैष्णो देवीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र अंबाला-दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील ट्रकने बसला उडवले. अपघातानंतर बसचे अक्षरश: दोन तुकडे झाले आणि ट्रकही पलटी झाला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये झोपेत असलेल्या भाविकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही.

बसमधून प्रवास करणाऱ्या शिवानीने या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, बसचालकाने दारू प्यायली होती. अपघात होताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी होते. रात्रीची वेळ असल्याने आमच्या डोळ्यावर झोपेची झापड येत होती आणि अपघाताने आमचे डोळे उघडले. अपघातानंतर घटनास्थळावर रक्तमांसाचा चिखल पडला होता.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बसमधून बाहेर काढत सिव्हील रुग्णालयात दाखल केले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, तर जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती सिव्हील रुग्णालयाचे डॉ. कौशल कुमार यांनी दिली.