
एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाडय़ांचे टप्प्याटप्प्याने ‘एलएनजी’मध्ये रूपांतर करण्यास आज झालेल्या महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक ‘सह्याद्री’ अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने यापूर्वी दोनदा ही बैठक रद्द करावी लागली होती.
एसटीच्या ताफ्यात यापूर्वी दोन हजार बसेस घेण्यास मान्यता देण्यात आली होती. आता त्यामध्ये वाढ करून 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या बस घेण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्यासही तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. इलेक्ट्रिक बसेस या वातानुकूलित असल्याने त्याचे सध्याच्या वातानुकूलित बसेसपेक्षा तिकीट दर कमी ठेवून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. सीएनजी बसेसच्या चेसिस उपलब्ध होत नसल्याने आणि सीएनजी पंपांची कमी संख्या पाहता सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल बसेस ताफ्यात घेण्यास आणि पुणे, सांगली विभागासाठी 180 बसगाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यासही यावेळी मान्यता मिळाली.
डिझेल बसचे एलएनजीमध्ये रूपांतरण
डिझेलवर धावणाऱया पाच हजार बसेसचे लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) इंधनामध्ये रूपांतरण करण्यात येईल. यामुळे डिझेलच्या सध्याच्या दरापेक्षा 20 ते 25 टक्के कमी दराने एलएनजीचा पुरवठा होईल. संपूर्ण बस वातानुकूलित असल्याने कमी पैशांमध्ये प्रवाशांना प्रवास करता येईल. सुरुवातीला यात महामंडळाला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही.
ईटीआय यंत्राद्वारे बस तिकीट
अॅण्ड्रॉईडवर आधारित ईटीआय यंत्राद्वारे प्रवाशांना एसटी बसची तिकिटे मिळतील. डेबिट, व्रेडिट कार्ड, गुगल पे आदी ऑनलाईन पेमेंटद्वारे प्रवाशांना आता तिकिटे मिळतील. त्याशिवाय मोबाईल अॅप-संकेतस्थळाद्वारे आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध होईल.


























































