
उत्तर बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दार्जिलिंग जिह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले, ज्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. एनडीआरएफचे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
कालिम्पोंग आणि सिक्कीम जिह्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कालिम्पोंगमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. दार्जिलिंग जिह्यात भूस्खलन आणि पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारने मात्र अद्याप मृतांची अधिकृत संख्या जारी केलेली नाही. दुर्गापूजेनंतर कोलकाता आणि बंगालच्या अन्य भागांतील लोक दार्जिलिंगला जातात. पावसामुळे पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बंगाल पोलिसांनी हेल्पलाईन नंबरही जारी केले आहेत.
लोखंडी पूल कोसळला, वाहतूक ठप्प
पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे दुधिया येथील लोखंडी पुलाचा एक भाग कोसळल्यानंतर सिलीगुडी-दार्जिलिंग एसएच-12 रस्त्यावर वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. मिरिक-सुखियापोखरी रस्त्याजवळ सर्वात मोठे भूस्खलन झाले, ज्यामुळे अनेक घरे वाहून गेली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे आजूबाजूच्या अनेक लहान गावांचा संपर्क तुटला. 6 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा, भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.