शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर प्रकल्प डेडलाईनआधीच पूर्ण करणार, एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधील अंतर कमी करणारा आणि वाहतूककोंडीतून सुटका करणारा देशातील सर्वाधिक लांबीचा शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर प्रकल्प डेडलाईनआधीच पूर्ण होईल, असा विश्वास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे ‘एमएमआर’च्या विकासाला गती मिळणार आहे.

कोरोना काळातही राज्यातील विकासकामे सुरू असून मुंबई, नवी मुंबई आणि रायगडला जोडणाऱया शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर प्रकल्पाच्या कामाची पाहणी आज नगरविकासमंत्री शिंदे यांनी केली.

तब्बल 100 वर्षे टिकेल अशा पद्धतीने या पुलाची बांधणी करण्यात येत असून 3 अधिक  3 लेन असलेल्या 22 किमी लांबीच्या या सागरी मार्गाचे जवळपास 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. 17 हजार कोटींचा हा प्रकल्प असून वित्त पुरवठय़ासाठी ‘जायका’समवेत करार झाला असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यावेळी ‘एमएमआरडीए’ आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आणि एल अॅण्ड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

मुंबईहून पुणे, गोवा, अलिबाग तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलदगतीने जाण्यासाठी ट्रान्सहार्बर लिंकचा उपयोग होणार आहे.

मुंबईकडील बाजूने हा प्रकल्प कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पही स्वतंत्ररीत्या राबवत असून त्या कामाचा कार्यादेशही लवकरच देण्यात येणार आहे.

तीन टप्प्यांत ट्रान्सहार्बर प्रकल्पाचे काम सुरू असून पहिला टप्पा  1 एल अॅण्ड टी आणि आयएचआय कंन्सोर्टिअम, दुसरा टप्पा देऊ ई अॅण्ड सी आणि टाटा प्रोजेक्ट्स जेव्ही आणि तिसरा टप्पा एल अॅण्ड टी ही कंपनी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या