दिल्लीत लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अटकेत, बांगलादेश कनेक्शनचा मोठा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दहशतवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. स्पेशल सेलने लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन ऊर्फ राजा याला दिल्लीतून अटक केली आहे. शब्बीर हा मूळचा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचा रहिवासी असून, तो गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. बांगलादेशमध्ये बसून हिंदुस्थानच्या विरोधात दहशतवादी कारवाया करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान दहशतवादी शब्बीरसंदर्भात मोठी माहिती समोर आली. शब्बीर पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) च्या सूचनेनुसार बांगलादेशातून कारवाया करत होता. पाकिस्तानचा सहभाग लपवण्यासाठी तो बांगलादेशी नागरिक आणि हिंदुस्थानात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांची दहशतवादी कृत्यांसाठी भरती करत असल्याची माहिती मिळाली आहे. नुकत्याच दिल्ली आणि दक्षिण हिंदुस्थानात उघडकीस आलेल्या लष्करच्या मॉड्युलशीही त्याचे संबंध असल्याचे बोलले जात आहे.

शब्बीर हा लष्करचा एक प्रशिक्षित दहशतवादी असून त्याने मुझफ्फराबादमधील दहशतवादी तळावर प्रगत प्रशिक्षण घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्याचे संबंध 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद आणि झाकी-उर-रहमान लखवी यांच्याशी असल्याचे समजते. यापूर्वी 2007मध्ये त्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली होती. यानंतर 2018 पर्यंत तो तिहार जेलमध्ये होता. जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला होता.

सुरक्षा यंत्रणा आता शब्बीरची कसून चौकशी करत आहेत. बांगलादेशातून त्याने कशा प्रकारे नेटवर्क उभे केले, त्याला कोठून निधी मिळत होता आणि त्याच्या निशाण्यावर हिंदुस्थानातील कोणती ठिकाणे होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. या अटकेमुळे लष्कर-ए-तैयबाच्या हिंदुस्थानविरोधी कटाचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.