आर्यन खानचा जामीन फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रूज ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला. 13 ऑक्टोबरला आर्यनच्या जामिनावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला होता. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचेही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे तिघांचाही मुक्काम आता आर्थर रोड तुरुंगातच असणार आहे.

आर्यन खानच्या जामिनावर आज विशेष न्यायालयात प्रदीर्घ चर्चा झाली. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (एनसीबी) न्यायालयात आर्यनचे काही मोबाईल चॅट सादर केले. ते ड्रग्जसंदर्भात होते. आज आर्यनला जामीन मिळणार की त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुपारी पावणे तीन वाजता न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन, अरबाज आणि मुनमुनचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

न्यायालयीन कोठडीनंतर आर्यनच्या वकिलांनी विशेष सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. आर्यनने कोणतेही ड्रग्ज सेवन केले नव्हते. तसेच त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद आर्यनच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. तर एनसीबीने आर्यनच्या जामिनाला विरोध केला होता.

उच्च न्यायालयात धाव

विशेष सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी दुपारी तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्यनचे वकील ऍड. सतीश मानेशिंदे व ऍड. अमित देसाई यांनी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी तारीख मिळावी म्हणून न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायमूर्तींनी वेळेअभावी आर्यनच्या वकिलांचे कोणतेच म्हणणे ऐकून न घेता कामकाज तहकूब केले. त्यामुळे सुनावणीसाठी तारीख मिळावी म्हणून उद्या गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता हायकोर्टात आर्यनचे वकील न्यायमूर्तींसमोर अर्ज करणार आहेत.