
सामना ऑनलाईन। श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करुन ज्यांची हत्या केली होती त्या राष्ट्रीय रायफल्सचे शहीद जवान औरंगजेब यांना हिंदुस्थानी लष्कराने शौर्य चक्र देऊन सन्मानित केले आहे. औरंगजेब यांना शौर्य व बलिदानासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
१५ जून रोजी ईद साजरी करण्यासाठी घरी निघालेल्या औरंगजेबचे दहशतवाद्यांनी वाटेतच अपहरण केले होते. त्यानंतर गोळ्यांनी चाळण केलेला औरंगजेब यांचा मृतदेह पुलवामा जिल्हयातील गुस्सू भागात सापडला होता.
औरंगजेब यांनी घरी जाण्यासाठी लष्कराच्या तळापासून काही अंतरावरुन शोपियांनला जाण्यासाठी टॅक्सी पकडली होती. पण रस्त्यातच कालम्पोरा गावाजवळ दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. टॅक्सी चालकाने याबद्दल पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस आणि जवान यांनी संयुक्तपणे औरंगजेबला शोधण्यासाठी मोहिम राबवली. अखेर कालम्पोजवळून १० किलोमीटर अंतरावर औरंगजेबचा मृतदेह सापडला. पूंछ जिल्ह्यात राहणारा औरंगजेब जम्मू-कश्मीर लाईट इन्फेंटरी मार्गावरील ४४ राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये काम करत होते. हिजबुलचा दहशतवादी समीर याचा खात्मा करणाऱ्या मेजर रोहित शुक्ला यांच्या टीममध्येही औरंगजेबचा समावेश होता. औरंगजेब याने अनेक दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली होती.
summary…shahid aurangjeb honourd with shurya chakra
























































