सांख्यिकी!

410

>> शैलेश माळोदे

डॉ. सी. आर. राव. संख्याशास्त्रातील प्रकांड पंडीत. आजच्या तरुणांसाठी ऊर्जेचे रोल मॉडेल.

ते वर्ष होतं 2013. संयुक्त राष्ट्र संघटनेनं ते वर्ष आंतरराष्ट्रीय सांख्यकी वर्ष (इंटरनॅशनल ईयर ऑफ स्टॅटिस्टिक्स) जाहीर केलं होतं. त्या वर्षी एक आंतरराष्ट्रीय परिषद नाशिकला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे प्रमुख संयोजक होते प्रा.डॉ. अनिल गोरे, पुणे विद्यापीठाच्या सांख्यकी विभागाचे माजी प्रमुख आणि हिंदुस्थानच्या सांख्यकी आयोगाचे माजी सदस्य. त्यांच्याशी गप्पा मारताना जागतिक स्तरावरील सर्वात ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ.सी.आर.राव यांचा विषय निघाला. डॉ. अनिल गोरेंनी त्यांच्याविषयी त्यांच्या संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ.सी.आर.राव या ऋषितुल्य संख्याशास्त्राविषयी संख्याशास्त्र जगात प्रचंड सादर आहे. कारणही तसेच आहे. इतकं प्रचंड कर्तृत्व गाजवलेल्या एफआरएस (फेलो ऑफ रॉयल सोसायटी) डॉ. कल्यामपुडी राधाकृष्ण ऊर्फ सी.आर.राव यांनी 10 सप्टेंबरला वयाच्या शंभरीत प्रवेश केलाय. 1920 साली जन्मलेले हिंदुस्थानी अमेरिकन संख्याशास्त्रज्ञ/गणितज्ञ राव यांना 2002 साली अमेरिकन सरकारने नॅशनल मेडल ऑफ सायन्स हा सर्वोच्च वैज्ञानिक बहुमान प्रदान करून सन्मानित केलं. अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने त्यांचं वर्णक जिवंत दंतकथा (लिव्हिंग लिजंड) असं केलंय. त्यांच्या संशोधन कार्याचा प्रभाव फक्त संख्याशास्त्र्ाज्ञच नव्हे तर अर्थशास्त्र, अनुवंशशास्त्र, मानववंशशास्त्र, भूशास्त्र, राष्ट्रीय नियोजन, लोकसंख्याशास्त्र, बायोमेट्री आणि वैद्यक शास्त्र अशा विविध क्षेत्रांवर फार मोठा असल्याचं दिसले.

पॅनसिल्व्हानिया स्टेट युनिव्हर्सिटीत मानद प्राध्यापकपदी असलेले डॉ.सी.आर.राव बफोलो विद्यापीठाचे संशोधन प्राध्यापकदेखील आहेत. विविध मानद डॉक्टरेट्स आणि 38 विविध सेमिनार्सद्वारे सन्मानित डॉ. राव यांना ‘द टाईम्स ऑफ इंडिया’नं हिंदुस्थानच्या दहा सर्वोत्कृष्ट शास्त्र्ाज्ञ यादीत समाविष्ट केलंय. कर्नाटकात, खरं म्हणजे ब्रिटिशकालीन मैसूर राज्यात जन्मलेले राव अमेरिकन नागरिक असले तर हिंदुस्थान, ब्रिटनमध्येदेखील वास्तव्यास असतात. ‘क्रॅमर-राव बाऊंड’, राव ब्लॅकवेल प्रमेय, ऑर्थोगॉनल ऍरेज आणि स्कोअर स्टेस्टसाठी ओळखले जाणारे डॉ. राव भटनागर पारितोषिक आणि पद्मविभूषण या दुसऱया क्रमांकाच्या नागरी पुरस्काराने  सन्मानित आहेत. रोनॉल्ड फिशर या जगप्रसिद्ध संख्याशास्त्राज्ञाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1948 साली ‘स्टॅटिस्टिकल प्रॉब्लेम्स ऑफ बायॉलॉजिकल क्लासिफिकेशन्स’ हा प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली.

एका तेलुगू कुटुंबात जन्मलेले राव दहा अपत्यांपैकी आठवे होते. हदगल्ली बल्लारी (कर्नाटक) इथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी आंध्र विद्यापीठातून गणित विषयात एमएस्सी पदवी संपादन केली. 1943 साली मी कलकत्ता विद्यापीठातून एम.ए.(सांख्यकी) पदवी मिळवून किंग्ज कॉलेज, केंब्रिज विद्यापीठात दाखल झालो. 1948 मध्ये पी.एच.डी. आणि 1965 साली एस्सी डी. या उच्च पदव्या केंब्रिजमधून प्राप्त केल्या. सुरुवातीस मी पी.सी.महालनोबिस यांनी स्थापन केलेल्या ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट (आय.एस.आय.) आणि मग केंब्रिजच्या ऍथ्रॉपॉलिजिकल म्युझियममध्ये काम केले. मी आयएसआयचा संचालक होतो. डॉ. राव यांनी जवाहरलाल नेहरू प्राध्यापक आणि नॅशनल प्रोफेसर म्हणून हिंदुस्थानात कार्य केलंय. 40 वर्षांपेक्षा जास्त काळ आयएसआयचे प्रशिक्षण प्रमुख आणि संचालक म्हणून कार्य केलं. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी गणित क्षेत्रात अनेक दिग्गज घडवले. त्यांच्या शिफारसीनुसार एशियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट आताची स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट फॉर आशिया ऍण्ड पॅसिफिक टोक्योला स्थापन करण्यात आली.

त्यांच्या याआधी उल्लेख झालेल्या संशोधनाबरोबरच त्यांनी मल्टिव्हेरिएट ऍनालिसिस, एस्टिमेशन थिअरी आणि डिफरेन्शिएल जॉमेट्री क्षेत्रात योगदान दिले. त्यांनी 14 पुस्तकं आणि 400 पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. 2010 साली हिंदुस्थान सरकारनं इंडियन सायन्स ऍवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित केलं. वैज्ञानिक क्षेत्रातील हा सर्वोच्च हिंदुस्थान पुरस्कार आहे. केंद्रीय सांख्यकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने त्यांच्या सन्मानार्थ ‘नॅशनल ऍवॉर्ड इन स्टॅटिस्टिक्स’ची स्थापना केलीय. केंद्रीय विद्यापीठ हैदराबादजवळून जाणाऱया लिंगमपल्ली येथील एका रस्त्याला ‘प्रा.सी.आर.राव रोड’ असं नाव देण्यात आलंय. संख्याशास्त्र्ाविषयक विश्वकोश तयार करण्यासंदर्भातील त्यांच्या योगदानासाठी त्यांचं 2013 साली इतर दोन संख्याशास्त्र्ाज्ञांसोबत नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं होतं.

आठ अकादमींचं सन्माननीय सभासदस्यत्व त्यांना प्रदान करण्यात आलंय. या अकादमी हिंदुस्थान, ब्रिटन, अमेरिका आणि इटलीतील आहेत. जर्नल ऑफ करान्टिटेटिव्ह इकॉनॉमिक्स’ने 1991 साली त्यांच्या सन्मानार्थ एक विशेष अंक प्रकाशित केला. त्यात म्हटलं होते की, डॉ. राव हे एक अत्यंत विद्वान शास्त्र्ाज्ञ असून सध्याच्या काळातील अत्यंत सन्मान्य संख्याशास्त्रज्ञ आहेत. त्यांचं जगातील संख्याशास्त्र्ा क्षेत्रातील योगदान, मग ते बॅचलर किंवा मास्टर्स स्तरांवरील पदवी अभ्यासक्रमांबाबत असो वा त्यांच्या संशोधन समावेशामुळे मूल्यवर्धित झालेले असो, अत्यंत आगळंवेगळं आहे. ते एक अत्यंत प्रोत्साहित करणारे शिक्षक असून त्यांनी संख्याशास्त्र्ाातील विविध गुणवंतांना मार्गदर्शन करण्याबरोबरच संशोधनक्षेत्राला प्रभावित केलंय. हिंदुस्थानातील इकोनॉमेट्रिक संशोधनातील त्यांचा वाटा मोठा आहे. वयाच्या शंभरीतदेखील डॉ.सी.आर.राव शैक्षणिक क्षेत्रात कार्यप्रवण असून तरुणांसाठी ऊर्जेचं रोल मॉडेल आहेत. इंडिया हार्ट असोसिएशन या संख्येचे वरिष्ठ नीती आणि सांख्यकी सल्लागार असून हृदयविकाराबाबत जागरुकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या