
नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ मार्गाला विरोध होत असतानाच राज्य सरकारने या मार्गाचे संरेखन (अलायनमेंट) बदलण्याचा निर्णय घेतला असून नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
शक्तिपीठ प्रकल्प हा धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तो लाभदायी ठरेल. मात्र, धाराशीवमध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला आहे. या विरोधाचा आदर ठेवत सरकारने मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले.
विरोध धाराशीव परिसरापुरता मर्यादित आहे. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. त्यामुळे शक्तिपीठ मार्गाचे नवे संरेखन सोलापूर आणि सांगली जिह्यांमधून नेण्यात येईल, ज्यामुळे या दोन्ही जिह्यांचा शक्तिपीठाशी थेट संपर्क प्रस्थापित होईल, असे फडणवीसांनी सांगितले.


























































