50 ।। श्री शंकरगाथा ।।

71

>>चैतन्यस्वरूप>>

श्रीशंकर महाराजांचा कीर्तीसुगंध सर्वत्र सर्वदूर दरवळत होता त्यामुळे बाहेरगावहून अनेक भक्त श्रीमहाराजांचे दर्शन व मार्गदर्शन प्राप्त करून घेण्याकरिता येत असत. एकदा एक सधन गृहस्थ श्रीमहाराजांकडे आले. मनाने अतिशय दुःखी असलेल्या त्या गृहस्थांनी आपले मन श्रीमहाराजांसमोर मोकळे केले. ‘महाराज! जीवनात सारे काही आहे. परंतु जिवाला चैन नाही. घरात संपत्ती असूनही मन रमत नाही, सालस पत्नी असूनही मन बाहेर धावते, मानसन्मान होत असूनही अजून अतृप्तीच आहे. तेव्हा आपणच काय तो मार्ग दाखवावा.’

श्रीमहाराज म्हणाले, ‘बाबा रे! जगातील सर्व सुखे लाभली तरी हे मन काही तृप्त होत नाही. आपल्यापाशी आहे त्यापेक्षा अधिक वैभव, अधिक सौंदर्य आणि अधिक मानसन्मानाचा शोध घेत ते बाहेर हिंडत राहाते आणि दुःखाला आमंत्रण देते. मन कधीही स्थिर राहात नाही. हरघडी त्यात अनेक विचार निर्माण होत राहातात. माणूस दुःखी होतो, कारण तो जगण्यासाठी आवश्यक ते बदल करीत नाही. जो परिपूर्ण आहे, अखंड आनंदरूप आहे अशा भगवंताकडे आपण वळलो तर आपल्या जगण्याला शाश्वत समाधान मिळेल. भगवंताच्या प्रेमाची ओढ लागली की, घरातल्या मीठ-भाकरीलाही मिष्टान्नाची चव येते. जीवनाचे शाश्वत मूल्य कळले तरच अशाश्वत गोष्टीतला आनंद मिळवता येतो, मात्र शाश्वताला समजून न घेता अशाश्वत गोष्टीतून सुख व शांती मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होत नाही. आहे त्या प्रपंचामध्ये माणूस सुखी राहू शकत नाही याचे कारण हेच आहे. गरीब, मध्यम व श्रीमंत माणूस आपल्या प्राप्त परिस्थितीतही दुःखी असतो, कारण त्याचा विचार फक्त त्याच्या प्रपंचापुरताच मर्यादित असतो. मी अन् माझे या पलीकडे तो कधी जातच नाही. स्वतःच्या प्रपंचास खरे मानून त्यातच सुखी होण्याकरिता तो धडपड करीत राहातो म्हणून त्याला शाश्वत सुख लाभत नाही. अनेक गोष्टींचा अनावश्यक साठा करण्यात त्याचे आयुष्य निघून जाते. मन जर का भगवंतांच्या पायाशी लीन झाले तर ते भरकटणार नाही. जे मिळालेले आहे ते ईश्वराच्या कृपेने लाभलेले आहे असे समजून त्यातच समाधान मानले तर अनेक समस्या चुटकीसरशी दूर होतील.’

एकदा, एक बुद्धिवादी गृहस्थ श्रीमहाराजांकडे आले आणि म्हणाले, ‘संतसत्पुरुषांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात वैचारिक गोंधळ उडालेला आहे हे आपणांस मान्य आहे काय?’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘या वैचारिक गोंधळाला संतसत्पुरुष जबाबदार नसून त्यांचे अनुयायी कारणीभूत आहेत. ही मंडळी आपला स्वार्थ साधण्याकरिता संतसत्पुरुषांच्या नावाने पंथ वां संप्रदाय निर्माण करतात. संतांच्या शिकवणीचा अर्थ मलाच कळलेला असून मीच त्यांचा खरा शिष्य आहे असा अहंकार बाळगणारेच वैचारिक गोंधळ माजवत असतात.’

अनेक मुसलमान मंडळीदेखील श्रीमहाराजांपाशी शंका-निरसन करण्याकरिता येत असत. त्यांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये श्रीमहाराज त्यांच्या शंकांचे निरसन करीत असत. एके दिवशी अशीच काही मुसलमान मंडळी त्यांच्या मनातील शंका घेऊन श्रीमहाराजांकडे आली तेव्हा श्रीमहाराजांनी उपदेश करतेवेळी कुराणातील अनेक उतारे म्हणून दाखविले. हे पाहून त्या मंडळींनाही आश्चर्य वाटले. त्यातील एकाने ‘महंमद पैगंबराचा उपदेश नेमका काय?’ असे विचारले असता श्रीमहाराज म्हणाले, ‘इस्लाम शब्दाचा खरा अर्थ शांती असा आहे. पैगंबर नेहमीच अल्लाहकडे प्रार्थना करीत असत की, मला शांतीचा मार्ग दाखव. लोक त्यांना त्रास देत असत तरीही पैगंबर शांतीचा प्रचार करीत राहिले. गरिबांविषयी त्यांच्या मनात दयाभाव होता. ‘कुणालाही विनाकारण मारू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, ऐषोआराम करण्यात आयुष्य वाया घालवू नये, मेहनत करून खावे. इस्लाम श्रद्धा, धैर्य, सहिष्णुता इत्यादी श्रेष्ठ सद्गुणांचे संवर्धन करतो.’ असे त्यांचे ठाम मत होते. पैगंबर म्हणत असत की, ‘स्वच्छ आणि पाक (पवित्र) हृदयामध्येच खरी मस्जिद असते. इस्लामाचा खरा दृष्टिकोन परमेश्वराबद्दल असीम श्रद्धा आहे. प्रेम ही ‘खुदा’ है.’ श्रीमहाराजांचा इस्लाम धर्माचा अभ्यास पाहून मुस्लिम मंडळीही थक्क होत असत.

 ([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या