
राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विनाशुल्क खुल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत अझरबैझानचा ग्रॅण्डमास्टर व्हुगर रसुलोव्ह विजेता ठरला. ग्रॅण्डमास्टर रसुलोव्हने सर्वाधिक साखळी 12 गुण नोंदवीत अजिंक्यपदाला गवसणी घातली. गुजरातच्या कर्तव्य उनाडकटने उत्तम लढत देऊनही अखेर साखळी 11.5 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानले. तृतीय क्रमांकासाठी तामीळनाडूचा ग्रॅण्डमास्टर आर. आर. लक्ष्मण व दिल्लीचा फिडेमास्टर आर्यन वार्ष्णेय यांनी चुरस निर्माण करूनही समान साखळी 11 गुणांमध्ये सरस सरासरीच्या बळावर आंध्र प्रदेशच्या इंटरनॅशनल मास्टर धुलीपल्ला बीसीपीने बाजी मारली.
मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलन्स यांच्या सहकार्याने झालेल्या ऑनलाइन स्विस लीग पद्धतीने लीचेस प्लॅटफॉर्मवरील बुद्धिबळ स्पर्धेत हिंदुस्थानसह रशिया, इंडोनेशिया, अझरबैझान, बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुद्धिबळपटूंसह 276 नामवंत खेळाडूंनी भाग घेतला. तामीळनाडूच्या ग्रॅण्डमास्टर आर. आर. लक्ष्मणने (11 गुण) चौथा, दिल्लीच्या फिडे मास्टर आर्यन वार्ष्णेयने (11 गुण) पाचवा, महाराष्ट्राच्या फिडेमास्टर निखिल दीक्षितने (10.5 गुण) सहावा, तामीळनाडूच्या अरुल आनंधने (10 गुण) सातवा तर महाराष्ट्राच्या गोपाळ राठोडने (10 गुण) आठवा क्रमांक मिळवला. स्पर्धेमध्ये टॉप-10 मध्ये स्थान मिळविणारा 16 वर्षांखालील महाराष्ट्राचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू तन्मय पवारला (10 गुण) मिळाले.



























































