
इलेक्ट्रॉनिक चीप असलेली कोणतीही मशीन हॅक होऊ शकते. ईव्हीएम मशीनबाबत राजकीय पक्षांसह जनतेच्या मनातही संभ्रम आहे. निष्पक्ष व स्वतंत्र पद्धतीने निवडणूका व्हाव्यात आणि लोकशाहीचा संकोच होऊ नये, यासाठी ईव्हीए मशीनबाबत जो काही संभ्रम आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने दूर करावा, अशी ठाम भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबाबत अनेक राजकीय पक्षांचे आक्षेप आहेत. ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग करून भाजप वारंवार सत्तेत येत आहे, असा विरोधकांचा आक्षेप आहे. ज्या वेळी मशीनमध्ये गडबड होते. त्यावेळी मतदानाचा काwल भाजपाकडे जातो. मशीनऐवजी बॅलट पेपरवर मतदान झाल्यावर भाजपाच्या विरोधात निकाल लागतो, अशी आजवर अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे देशभरातच एपंदरीत ईव्हीएम मशीन्सबद्दल जनमानसांत असलेल्या शंका कुशंका लक्षात घेऊन शरद पवार या मशीनच्या मुद्दय़ावर मैदानात उतरले आहेत. पवारांनी याच मुद्दय़ावर देशभरातील विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएम मशीन्सबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीला काँगेसतर्फे दिग्विजय सिंग, ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल, समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील गटनेते रामगोपाल यादव, भारत राष्ट्र समितीचे केशव राव, भाकपाचे डी. राजा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनिल देसाई हे उपस्थित होते.
ईव्हीएमचा अट्टहास कशासाठी?
राजकारणात हार जीत होत असते, मात्र पराभव हा मशीन्सच्या त्रुटीचा वापर करून होत असेल तर ते देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. अमेरिका आणि जर्मनी सारख्या प्रगत देशात ईव्हीएम मशीन्सचा वापर होत नाही. मग आपल्याच देशात मशीन्सचा अट्टहास कशासाठी, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. ईव्हीएम मशीन्सचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. निवडणूक आयोगाने व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही तर पुढची रणनिती आम्ही सगळे विरोधी पक्ष एकत्र बसून ठरवू, असेही सिब्बल यांनी स्पषट केले. अनैतिक तत्त्वांकडून लोकशाहीचे अपहरण आम्ही होऊ देणार नाही, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ईव्हीएम बाबतचा संभ्रम निवडणूक आयोगाने तातडीने दूर करण्याची गरज आहे, असे परखड मत शरद पवार यांनी मांडले. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल यांनीही भूमिका मांडली.