
दिल्लीच्या सीमेवर अडीच महिन्यांपासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. या शेतकरी आंदोलनातून केंद्रातील मोदी सरकार निश्चितच धडा घेईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे कृषिभूषण दत्तात्रेय काळे यांनी विकसित केलेल्या द्राक्षाच्या ‘किंगबेरी’ या नव्या वाणाचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार बबनराव शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे, यशवंत माने, रवींद्र बाबर, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, प्रदीप गारटकर, उमेश परिचारक, कृषिभूषण दत्तात्रेय काळे, प्रल्हाद काशिद उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, नान्नजमध्ये आल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. नान्नजकरांनी शेतीक्षेत्रात नवनवीन विक्रम केले आहेत. कमी पाण्याची पिके घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. भविष्यात शेतकऱयांनी शेतीमध्ये नवे विज्ञान, तंत्रज्ञान आणणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून ज्यादा उत्पादन घ्यावे. शेती सुधारण्यासाठी विज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. शेतकऱयांच्या तंत्रज्ञानातूनच नवनवीन वाणांचा जन्म झाला आहे. दिवंगत नानासाहेब काळे यांच्यानंतर त्यांचे पुत्र दत्तात्रेय यांनी शेतीमध्ये आधुनिकता आणली आहे.
दरम्यान, द्राक्ष उत्पादने निर्यात करणाऱया जवळपास 80 कंपन्यांनी शेतकऱयांचे पैसे बुडवले आहेत. त्या कंपन्यांची यादी माझ्याकडे आली आहे. याबाबत एक-दोन दिवसांत दिल्लीमध्ये जाऊन संबंधित कंपन्यांना धडा शिकवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, शरद पवार यांनी मला शेतीचे वेड लावले. आज माझ्याकडेही द्राक्षाची बाग आहे. मात्र, सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा शेतकऱयांना फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी एखादी गोष्ट आपल्या मनात घेतल्यानंतर त्याचा ते बरोबर कार्यक्रम करतात, असेही ते म्हणाले.
लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधारी पक्षातीलच घटक
n प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे हे शेतकरी नव्हते तर सत्ताधारी पक्षातीलच काही घटक होते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच हा हिंसाचार घडविण्यात आल्याची आमची माहिती आहे. दिल्लीच्या सीमेवर गेले अडीच महिने पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतील शेतकरी उपोषणाला बसले आहेत. खरेदीची आणि मालाची योग्य किंमत त्यांना मिळाकी एवढीच आंदोलनातील शेतकऱयांची मागणी आहे. हे आंदोलन करत असताना शेतकऱयांनी कुठेही कायदा हातात घेतलेला नाही. उलट सत्ताधारी पक्षातील काही घटकच आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शरद पवार म्हणाले.

































































