“मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीच केला नाही”, अजित पवारांच्या आरोपांना शरद पवारांचं उत्तर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मी शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही, हा कोणता न्याय? असा सवाल अजित पवार यांनी शिरूरच्या सभेत बोलताना केला होता. या आरोपांना शरद पवार यांनी आता प्रत्युत्तर दिले असून त्यांची ओरड निर्थक असल्याचे म्हटले आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिले.

अजित पवार माझ्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत आहेत. ‘मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर..’, अशी भाषा करत आहेत. पण कुटुंबप्रमुख म्हणून मी मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये कधीही भेद केला नाही, असे शरद पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांना पक्षाने काय कमी दिले? एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद अजित पवार याला केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. हे सर्व दिल्यानंतर अजून काय हवे होते? विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे राज्याची सूत्र होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्याची संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक आहे.

सुप्रिया सुळे चारदा लोकसभेवर निवडून आल्या असून त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होते. आता ती लोकसभेत पक्षाची गटनेता आहे. ती दिल्लीच्या राजकारणात आहे. परंतु तिला कधीही सत्तापद दिले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)