लोकसभेच्या निकालानंतर कोण संपेल हे कळेलच! शरद पवार यांचा भाजपवर पलटवार

शरद पवार यांची राजकीय कारकीर्द संपली असल्याची टीका भाजप नेते प्रचारसभेत करत आहेत. अशा नेत्यांवर शरद पवार यांनी आज पलटवार केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोण संपेल आणि कोण शिल्लक राहील हे भाजपला कळेलच, असा इशारा शरद पवार यांनी भाजप नेत्यांना दिला.

वर्ध्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून पत्रकारांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.

ईव्हीएममध्ये सुधारणा आवश्यक

ईव्हीएमवरील मतदारांचा संशय दूर करण्यासाठी यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. प्रगत देशांनी या आधीच ईव्हीएमने निवडणुका घेणे बंद केले आहे असे सांगत पवार यांनी ईव्हीएमला विरोध दर्शवला.

संजय सिंह यांच्यावर अन्याय झाला

आप नेते, खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, ही चांगली घटना आहे. संजय सिंह यांच्यावर अन्याय झाला. आता खरे चित्र जनतेसमोर येईल.

देशातील जनतेचा मूड मोदींविरोधी

देशातील जनतेचा मूड बदलला आहे. हा मूड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधी आहे हे स्पष्टपणे दिसत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा परिणाम तुमच्या पक्षावर होईल का? या प्रश्नावर पवार म्हणाले, जनता भाजपचा पराभव करण्यासाठी योग्य उमेदवारांना निवडून देईल.

महाराष्ट्रातील एक नेता आहे. ते आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पाच वर्षांपूर्वी ते प्रत्येक सभेत शरद पवार संपले, असे म्हणत होते. पण निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशी परिस्थिती होती की, पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱयांनी सरकार चालवले आणि त्या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले.

देशातील कोटय़वधी लोकांना घटनेने दिलेला अधिकार जतन करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आज देशाचे राजकारण आणि अधिकार ज्यांच्या हातात आहेत त्यांना जी काही शक्ती दिली गेली आहे त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे देशात एक अघोषित आणीबाणी पाहायला मिळत आहे.